तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी संपर्कातील ३२ जणांचा शोध

नवी मुंबई : दुसरी लाट ओसरल्यानंतर ५० पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत पालिका प्रशासनाने पुन्हा निर्बंध लागू केले असून दैनंदिन चाचण्यांवर भर दिला आहे. रविवार वगळता गेल्या काही दिवसांपासून सरासरी दिवसाला आठ हजार करोना चाचण्या करण्यात येत आहेत. तर बाधित रुग्णांच्या संपर्कातील ३२ जणांचा पथकांमार्फत शोध घेतला जात आहे.

शहरात वर्षभरात करोनाची एकूण रुग्णसंख्या १ लाखांच्या पुढे गेली असून करोनामुळे आतापर्यंत १७०० पेक्षा अधिक नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाट प्रचंड वेगाने वाढल्याने शहरातील आरोग्यव्यवस्था तोकडी पडल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. आता शहरात पुन्हा रुग्णवाढ होत असल्याने तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत प्रशासनाने तयारी केली आहे.

यासाठी खाटांची संख्या वाढविण्याबरोबर दुसऱ्या लाटेत मोठी समस्या निर्माण झालेला प्राणवायू पुरवठा कमी पडणार नाही याची काळजी घेतली आहे. यासाठी नुकताच पालिकेने प्राणवायू संकलन व सीटीस्कॅन सुविधा सुरू केली आहे. आरोग्यव्यस्थेबरोबर तिसरी लाट पसरू नये यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सहा ते साप हजारांपर्यंत असलेली करोना चाचण्यांची संख्या दहा हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यातून जास्तीत जास्त बाधित समोर येतील व त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू होतील अशी दक्षता घेतली जात आहे. तर संसर्ग अधिक पसरू नये यासाठी बाधितांच्या संपर्कातील जास्तीत जास्त जणांचा शोध सुरू केला आहे. बाधिताच्या संपर्कातील ३२ जणांचा शोध घेतला जात आहे. वारंवार रुग्ण सापडणाऱ्या सोसायटय़ांबाबत कडक उपाययोजना करून अशा सोसायटय़ांमध्ये सर्वच नागरिकांच्या चाचण्या करण्याकडे लक्ष दिले आहे.