नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वेगवेगळ्या महापालिकांमध्ये पराभूत झालेल्या माजी नगरसेवक अथवा उमेदवारांना पुन्हा मागच्या दाराने ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाची संधी दिली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नेत्यांपुढे मांडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या काही मातबर नेत्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. यापैकी काही जण स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. महापालिका निवडणुकीत पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या आणि संघटनात्मक आघाडीवर महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय शिंदे यांच्या गोटातून होण्याची चिन्हे आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ४२ जागांवर विजय मिळविता आला. वनमंत्री गणेश नाईक यांचे सुसूत्र नियोजन आणि भाजपच्या नवमतदारांची मिळालेली साथ यामुळे ६५ जागा मिळवून भाजप महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला. नाईक यांनी या निवडणुकीत केलेल्या आक्रमक प्रचारामुळे भाजपला ७० पेक्षा अधिक जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र ऐरोली उपनगरातील २० पैकी १६ जागांवर शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक विजयी झाले आणि नाईकांचे ‘पंचाहत्तर पार’चे स्वप्न भंगले. तरीही सलग सहा वेळा महापालिकेची सत्ता आपल्या हातात राखण्यात नाईक यशस्वी ठरले आहेत.
या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे अनेक प्रभावी उमेदवार पराभूत झाले. शिंदे यांच्या पक्षाला अशाच दिग्गजांच्या पराभवाचा फटका बसला. यामध्ये ऐनवेळी पक्षात आलेले एम.के.मढवी, नामदेव भगत यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश होता. सानपाडा भागात सोमनाथ वास्कर या एरवी चर्चेतील उमेदवाराला दारुण पराभव झाला. याशिवाय बेलापूर विधानसभा क्षेत्रातून रंगनाथ अैाटी ही शिंदेसेनेने जमेच्या बाजूला धरलेली जागाही पक्षाला गमवावी लागली. कोपरी गावातून विलास भोईर, तुर्भे-१४ गाव प्रभागातून महेश कुलकर्णी, घणसोलीतील जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या मुलीचा पराभवही शिंदेसेनेच्या जिव्हारी लागला आहे.
आता नव्यांना संधी
दरम्यान राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. भाजप आणि शिंदे यांच्या पक्षाचे स्वीकृत नगरसेवक मोठ्या संख्येने महापालिकेत असतील अशी शक्यता आहे. मात्र ही निवड करताना पराभूत उमेदवारांना संधी द्यायची नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांपुढे मांडल्याचे समजते.
ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई यासारख्या महापालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी कोणकोणती नावे असू शकतात याची चाचपणी सध्या शिंदेसेनेकडून सुरू आहे. नवी मुंबईतील पक्षाच्या नेत्यांची एक बैठक शिंदे यांनी नुकतीच त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घेतली. या बैठकीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जावी अशी भूमिका खुद्द शिंदे यांनीच मांडल्याचे समजते. यासंबंधी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी शिंदे यांनी आपली काही मते आमच्यापुढे मांडली आहेत, असे सांगितले. नव्या चेहऱ्यांना संघटनेत आणि महापालिकेत स्थान मिळावे अशी शिंदे यांची इच्छा आहे. परंतु यासंबंधी अंतिम निर्णय झालेला नाही, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.
काही नगरसेवक अपवाद?
ऐरोलीतील पक्षाचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या मुलीचा पराभव झाला असला तरी त्यांना मात्र स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याची तयारी पक्षाने दाखवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही पराभूत माजी नगरसेवकांनी स्वीकृत म्हणून संधी मिळावी यासाठी दबावतंत्र सुरू केले असले तरी त्याचा फार विचार करायचा नाही अशी आखणी शिंदे यांच्या पक्षातून सुरू आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून सोमनाथ वास्कर यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी द्यावी असा प्रस्ताव स्थानिक नेत्यांनी शिंदे यांच्यापुढे मांडल्याचे समजते.
