नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या शनिवारी दिवसभर नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांच्या आक्रमक भूमिकेमुळे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात नाईक आणि शिंदे यांची शिवसेना असा थेट सामना रंगू लागला आहे. गणेश नाईक यांच्या जनता दरबारास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीस हरकत घेत शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी शिंदे दिवसभर नवी मुंबईच्या दौऱ्यावर येत असून काही राजकीय प्रवेशानंतर ते शहरातील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष सध्या ठाणे जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या गावांचा नवी मुंबईशी कोणताही भौगोलिक संबंध नाही. अशा परिस्थितीत सधन असलेल्या महापालिकेवर या गावांचा बोजा कशासाठी असा सवाल करत नाईक यांनी या संघर्षाचे रणशिंग फुंकले. त्यानंतर सिडकोमार्फत शहरातील सोयीसुविधांसाठी आरक्षित असलेले भूखंड विकण्याचा होणारा प्रयत्न, बारवी धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने नवी मुंबई मिळत नसल्यामुळे शहरवासीयांमध्ये असलेली नाराजी नाईक यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. नवी मुंबईचे पाणी, भूखंड चोरणाऱ्यांना नवी मुंबईकर धडा शिकवतील, अशा शब्दांत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात रणशिंग फुंकल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या नवी मुंबईतील दौऱ्याकडे राजकीय वर्तुळात अनेकांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी नुकताच जाहीर झालेल्या प्रारूप विकास आराखड्यावरून गणेश नाईक यांनी यापूर्वीच नगरविकास विभागाला धारेवर धरले आहे. नाईक कुटुंबीयांनी घेतलेल्या हरकतीत हा आराखडा ठाण्यावरून आखला गेल्याचा आरोपही केला आहे. हा आराखडा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांना सोयीचा ठरेल अशा पद्धतीने तयार करण्यात आल्याचा आरोप होत असताना शिंदे समर्थकही या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सद्य:स्थितीत नवी मुंबई महापालिकेतील ४३ माजी नगरसेवकांचे बळ शिंदे यांच्यासोबत आहे. नाईक आणि भाजप असे एकूण ५८ माजी नगरसेवक शहरात आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांच्या नगरसेवकांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत नाईक आणि शिंदे असाच संघर्ष राहील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई महायुती व्हावी असा शिंदे यांच्या गटातील नेत्यांचा प्रयत्न आहे. नाईक मात्र त्यास अजिबात तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर येत्या २७ तारखेला नवी मुंबईच्या दौऱ्यावर असणारे शिंदे पक्षातील नेत्यांशी चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सभा आणि नेत्यांशी संवाद
ऐरोली मतदारसंघातील काही राजकीय नेत्यांच्या पक्ष प्रवेशानिमित्ताने विष्णुदास भावे नाट्यगृहात जाहीर सभेचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर वाशीतील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये शिंदे प्रमुख पदाधिकारी, नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
