पनवेलमध्ये विजेचा लपंडाव

महावितरणच्या अधिकाऱ्यांमधील असमन्वयाचा नागरिकांना त्रास

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

महावितरणच्या अधिकाऱ्यांमधील असमन्वयाचा नागरिकांना त्रास

वारंवार खंडित होणाऱ्या विजेबाबत महावितरणला जाब विचारणाऱ्यांची मोघम उत्तरे देऊन बोळवण केल्याचा अनुभव गुरुवारी पनवेलकरांना आला. शिवाय पनवेल महावितरणमधील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचेदेखील या वेळी दिसून आले.

पनवेलमधील वीज समस्येबाबत गुरुवारी काही नागरिकांनी महावितरणच्या उपकार्यकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांच्यासमोर शहरात वारंवार जाणाऱ्या विजेबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. या वेळी महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद देताना वीज समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले जाईल, असे उपस्थितांना अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांनी उपस्थितांनाच महावितरणच्या खोळंबलेल्या कामांचा पाढा वाचून स्वत:चा अकार्यक्षमपणा लपविण्याचा प्रयत्न केला. यावर कहर म्हणजे पनवेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून एकदाही वीज गेली नसल्याची नोंद उपकार्यकारी अभियंत्याने दिली असल्याने त्यांनाच विचारा, असा सल्लाही दिला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांना समस्येबाबत ठोस आश्वासन तर सोडाच, पण अधिकाऱ्यांमधील असमन्वयाचा नमुनाच पाहायला मिळाला.

पनवेल शहरात सुमारे ७८ हजार वीज ग्राहक आहेत. महिन्याला ते सुमारे आठ कोटी रुपयांची वीज देयके महावितरणला अदा करतात. तरीही पनवेलकरांच्या नशिबी खंडित वीजप्रवाह नित्याचा आहे. दिवसातून अनेक वेळा वीज नसणे ही पनवेल शहराची सध्या ओळख झाली आहे. यासाठी जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या तसेच जुनाट यंत्रणा कारणीभूत आहे. पनवेल नगर परिषदेची महापालिका झाल्यानंतर तरी निदान महावितरणचा हा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती, मात्र तसे परिवर्तन होण्याऐवजी विजेच्या त्रासापासून अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणाच नागरिकांसमोर येत आहे.

 

नवी मुंबईत वीज खंडित होण्याच्या प्रकारात वाढ

नवी मुंबई : आठवडय़ाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नवी मुंबईतील विविध भागांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. वाशी, घणसोली, कोपरखरणे, ऐरोली, दिघा या परिसरांत ही समस्या अधिक आहे. याशिवाय वाऱ्यामुळे विद्युतवाहिनीवर झाडे पडणे, काही ठिकाणी विद्युतवाहिनी तुटणे, भूमिगत केबल तुटल्यामुळे वीज खंडित होण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने नागरिक हैराण आहेत.

संततधार पावसामुळे शहरात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील अनेक भागांतील वीज दिवसभरातून ५ ते ६ वेळा खंडित होत आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

पावसाळा सुरू झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढलेले आहे. मात्र विद्युत विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी तत्परतेने कार्यरत आहेत.   सी. बी. मानकर, उपअभियंता, महावितरण.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Electricity scarcity in panvel

ताज्या बातम्या