नवी मुंबई महापालिकेची तयारी; आणखी सहा हजार खाटांसाठी निविदा प्रक्रिया

नवी मुंबई : अहमदनगरपासून सुरू झालेल्या करोनाच्या तिसऱ्या लाटेचे लोण कोणत्याही क्षणी राज्यात पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबई पालिकेने ऑक्टोबर महिन्यात ही लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन ११ हजार ५४२ विविध प्रकारच्या रुग्णशय्या तयार ठेवल्या आहेत. यात ऐरोली व नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालये सर्मपित कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली असून यात अत्यवस्थ रुग्णशय्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या ११ हजार रुग्णशय्यांवर पालिका न थांबता आणखी सहा हजार रुग्णशय्या झटपट तयार होतील अशी तयारी केली आहे. त्यासाठी पाम बीच मार्गावर दोन रिकाम्या इमारतीदेखील भाडय़ाने घेतल्या जाणार आहेत. बेलापूर येथे एका खासगी इमारतीत ४८५ रुग्णशय्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नवी मुंबई पालिकेने पहिल्या करोना लाटेचा सामना करताना आरोग्य यंत्रणा उभी करण्यात गटांगळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून टीका केली जात होती. त्यामुळे माजी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची उचलबांगडीदेखील करण्यात आली. त्यांच्या जागी आलेले आयुक्त अभिजित बांगर यांनी पहिल्या लाटेचा शेवटचा काळ व दुसरी लाट हाताळण्यात यश मिळविले होते.

यंदा पालिकेने दुसऱ्या लाटेसाठी खासगी रुग्णालयांतील रुग्णशय्यांचा ताबा घेतला होता. पालिका प्रशासनाच्या आदेशानेच खासगी रुग्णालयांतील रुग्णशय्या भरण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेत शहरात खासगी २२४८ व पालिकेच्या ४४५४ अशा एकूण ६७०२ रुग्णशय्यांची तयारी केली होती. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने या ६७०२ रुग्णशय्यांबरोबरच ४८४० रुग्णशय्यांसह खासगी रुग्णशय्यांची तयारी केली आहे. खासगी रुग्णशय्या परिस्थितीनुसार ताब्यात घेतल्या जात असल्याने त्यांचा आकडा निश्चित नाही, पण मागील २२४८ रुग्णशय्यांपेक्षा जास्त रुग्णशय्या असणार आहेत. या दोन्ही रुग्णशय्या मिळून पालिकेकडे आजच्या घडीस ११५४२ रुग्णशय्या तयार असून आणखी ६ हजार रुग्णशय्या तयार करण्याची निविदा प्रक्रिया तयार ठेवण्यात आली आहे. नवी मुंबईतील एकही रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी पालिकेने ही तयारी केली असून ३२ टनांपेक्षा जास्त ऑक्सिजन साठा केला जाईल, अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे.

अत्यवस्थ रुग्णांसाठी नेरुळ, ऐरोलीत व्यवस्था

गणेशोत्सव काळात चाळीसपर्यंत रुग्णसंख्या असलेल्या नवी मुंबईत गणेशोत्सवानंतर ७५ रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार तिसरी लाट हळूहळू वाढत असून ती ऑक्टोबरमध्ये अधिक असेल असे गणित मांडण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने ही तयारी केली असून डी. वाय. पाटील रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांसाठी व्यवस्थेसह वाशी येथील कोविड काळजी केंद्रात आता ७५ अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होऊ शकणार आहेत. याशिवाय पालिका ऐरोली येथे १८७ व नेरुळ येथे २२० रुग्णशय्या या केवळ अत्यवस्थ रुग्णांसाठी तयार केल्या जात आहेत.