नवी मुंबई पालिका प्रशासन सतर्क; विनामुखपट्टी फिरणाऱ्यांवर कारवाई

नवी मुंबई : करोना साथरोगामधील नवीन ओमायक्रॉन प्रकारामुळे नवी मुंबई पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. चाचणी, लसीकरण आणि विना मुखपट्टी फिरणाऱ्या नागरिकांवर तात्काळ कारवाई करण्याचे प्रमाण वाढविण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

उपचार सुविधा पूर्ववत सज्ज ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असून ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालये तीन दिवसांत युद्धपातळीवर तयार ठेवण्यात येणार आहेत. या दोन रुग्णालयांत जवळपास ४०० अत्यवस्थ रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पालिका हद्दीबाहेरील कामोठे एमजीएम व खारघर येथील येरळा महाविद्यालयातही रुग्णशय्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.

करोनाच्या नवीन ओमायक्रॉन प्रकारातील रुग्ण वाढण्याची शक्यता सर्वत्र व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार नवी मुंबई पालिकेनेही तयारीला सुरुवात केली आहे. दिवसाला यापूर्वी करण्यात येणाऱ्या सात हजार चाचण्यांची क्षमता कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेजारच्या कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात एक रुग्ण या प्रकारातील आढळून आल्याने नवी मुंबई पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या दोन शहरांची रोजगाराच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणात संलग्नता आहे. दिवसाला चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे त्याचप्रमाणे लसीकरणासाठी गर्दीच्या ठिकाणी पालिकेच्या रुग्णवाहिकाद्वारे हे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील रेल्वे तसेच बाजारपेठांमध्ये लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या १०९ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा घेतलेली आहे, तर ६८ टक्के नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत.

यापूर्वी पालिकेने या दंडात्मक कारवाईतून तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल केली आहे. मुखपट्टी झुगारून फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने कारवाईचा बडगा वाढणार आहे. एपीएमसीमध्ये पहाटे मोठय़ा प्रमाणात खरेदीदार येत असून हे विना मुखपट्टी फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विना मुखपट्टी कारवाईची सुरुवात पहाटे याच बाजारातून होणार आहे. याशिवाय पालिकेने यापूर्वीच १४ कोविड काळजी केंद्र, ६२५ अत्यवस्थ व प्राणवायू रुग्णशय्या तयार ठेवण्यात आलेल्या आहेत. ऐरोली येथे १९० अत्यवस्थ व प्राणवायू रुग्णशय्या तयार करण्याचे काम दोन दिवसांत होणार असून नेरुळ येथील १७८ रुग्णशय्यांसाठी २ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे वाशी येथील कोविड काळजी केंद्रातील ७५ अत्यवस्थ रुग्णशय्यांबरोबरच पालिका रुग्णालयातील या रुग्णशय्यांची संख्या ४४३ पर्यंत जाणार आहे. याशिवाय नेरुळ येथील खासगी रुग्णालय डी. वाय. पाटील रुग्णालयातील २०० रुग्णशय्या पालिकेला मिळणार आहेत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के रुग्णशय्यांचे नियोजन पालिकेच्या वतीने केले जाणार आहे. शहराबाहेर कामोठे येथे एमजीएम व खारघर येथील येरळा रुग्णालयाच्या ४९० रुग्णशय्या ह्य़ा ऑक्सिजन आवश्यकता असलेल्या रुग्णशय्यांसाठी तयार ठेवण्यात आलेल्या आहेत. पालिकेने शहरात व शहराबाहेर १२ हजार रुग्णशय्या तैनात ठेवण्याची तयारी केली आहे.

  • ऐरोली येथे १९० अत्यवस्थ व प्राणवायूू रुग्णशय्या  तर नेरुळ येथील १७८ रुग्णशय्यां सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

नव्या विषाणूमुळे सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील करोना काळजी केंद्र, करोना रुग्णालये व मुखपट्टी न घालणाऱ्यांवर कारवाई करणारी पथके पुन्हा सज्ज करण्यात आली आहेत.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका