नवी मुंबई – नवी मुंबईतील महत्त्वाचे स्थान असलेल्या बेलापूर टेकडीला अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. याबाबत स्थानिकांकडून जनआंदोलन करण्यात आले होते. तर राज्य मानवी हक्क आयोगानेही याची दखल घेत अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र येथील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच असल्याने स्थानिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

बेलापूर टेकडीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. याबाबत स्थानिक रहिवाशांनी ‘सेव्ह बेलापूर हिल्स’च्या बॅनरखाली एकत्र येत भव्य मानवी साखळी आंदोलन केले होते. राज्य मानवी हक्क आयोगाने ‘सुमोटो’ याचिका दाखल करून घेतली होती. सुनावणी दरम्यान, ही बांधकामे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आणि आयोगाने ती निष्कासित करण्याचे निर्देश सिडको व मनपाला दिले होते.

आयोगाच्या या निकालानंतर सिडकोने कारवाई केली. मात्र ही कारवाई केवळ ‘दिखावा’ ठरली. काहीच दिवसांत पुन्हा येथील अतिक्रमणाचा फास अधिक घट्ट झाला. या परिसरात पावसामुळे जमीन भुसभुशीत झाली असून भूस्खलनाचा धोका कायम आहे, असे तांत्रिक कारण पुढे करत सिडकोने कारवाईला ब्रेक लावला. मात्र ही बांधकामे करताना हा धोका का जाणवत नाही, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

बेलापूर टेकडी परिसरात वारंवार पाठपुरावा करूनही अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने, आता ‘सेव्ह बेलापूर हिल्स’ जनहित याचिका दाखल करणार आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने बेलापूरच्या निसर्गसंपदेचा विनाश होत आहे. हा विनाश रोखण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहोत. – सुदर्शन कर्णावत, सदस्य, सेव्ह बेलापूर हिल्स.