scorecardresearch

प्रत्येक नोडमध्ये इंग्रजी शाळा!; नवी मुंबई महापालिकेकडून सर्वेक्षणं

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील पालिकांच्या शाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढत असताना नवी मुंबई पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे.

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील पालिकांच्या शाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढत असताना नवी मुंबई पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने केंद्रीय शिक्षण मंडळाच्या तसेच राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक नोडमध्ये किमान एक इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू आहे.
नवी मुंबईतील रोजगार संधी, नव्याने उभी राहणारी बांधकामे, स्वस्त दरात मिळणारी सिडको व ग्रामीण भागातील घरे यामुळे महामुंबई क्षेत्रात वास्तव करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. नवी मुंबई पालिकेची लोकसंख्या आता पंधरा लाखांच्या घरात गेली आहे. आजूबाजूच्या महामुंबई क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी खुणावत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे आढळून आले आहे.
सध्या पालिकेच्या दिघा ते दिवाळे या क्षेत्रात एकूण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या ७२ शाळा असून यात ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवी मुंबई पालिकेने
या विद्यार्थ्यांसाठी अनेक अद्ययावत सेवा सुविधा दिलेल्या आहेत, हे पटसंख्या वाढण्यामागेदेखील प्रमुख कारण आहे.
वाढती विद्यार्थी संख्या आणि बदलता शैक्षणिक कल पाहाता पालिकेने कोपरखैरणे व नेरुळ येथे दोन केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा सुरू केलेल्या आहेत. या शाळांनादेखील चांगला प्रतिसाद लाभत असल्याने या वर्षी या दोन शाळांमध्ये आणखी भर घालण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. मराठी आणि सीबीएसई शाळांबरोबरच राज्य शिक्षण मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या देखील पालिका वाढविणार आहे. सध्या सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा कार्यरत आहेत. त्यात यंदा चार ते पाच शाळांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यासाठी परवानगीचे प्रस्ताव तयार केले जात आहेत.
तुर्भे स्टोअर येथील झोपडपट्टीत एक इंग्रजी शाळा असून पालिकेच्या यादीत ही शाळा बेकायदेशीर आहे. मात्र येथील रहिवाशी व काही सामाजिक संस्थांशी चर्चा केल्यानंतर ही शाळा बेकायदेशीर असली तरी आपल्या पाल्याला जगाची भाषा असलेली इंग्रजीतून शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढला असल्याचे दिसून आले. शहरातील सीबीएसई व इंग्रजी माध्यमांच्या शाळा भरमसाट शुल्क घेत असल्याने त्या ठिकाणी या गरीब पालकांना पाल्यासाठी प्रवेश घेणे मुश्कील आहे. त्यामुळे या बेकायेदशीर शाळांना पर्याय उपलब्ध करण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. नोड तेथे इंग्रजी शाळा अशी संकल्पना राबविली जाणार आहे. शाळा बांधण्यासाठी लागणाऱ्या भूखंडासाठी पालिकेला सिडकोवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पालिकेला हे मिशन अधिक सक्षमपणे राबविण्यास अडथळे येत आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या शाळा उत्तम दर्जाच्या करण्याचा पालिकेचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. बेकायदेशीर शाळांमध्ये पालक प्रवेश घेण्यास मजबूर असतात. त्यासाठी त्यांना अधिकृत पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळेच नवी मुंबई पालिकेने सीबीएसई व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: English school node surveys navi mumbai municipal corporation central board education amy

ताज्या बातम्या