scorecardresearch

शहरबात-नवी मुंबई : नवी मुंबईचे ढासळलेले पर्यावरण

हीच स्थिती बेलापूर येथील पारसिक टेकडीची आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर व धनदांडग्याचे बंगले आहेत.

environmental problems
नवी मुंबई रहिवाशांच्या जीवनशैलीमध्ये इतर शहरांच्या तुलनेत सुधारणा झाली असली तरी हवा व ध्वनिप्रदूषणात वाढ झाली असल्याचे दिसून येते

राज्यातील पहिले नियोजनबद्ध आणि अद्यावत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई रहिवाशांच्या जीवनशैलीमध्ये इतर शहरांच्या तुलनेत सुधारणा झाली असली तरी हवा व ध्वनिप्रदूषणात वाढ झाली असल्याचे दिसून येते. येथील वनसंपदा नष्ट करून उभारण्यात आलेल्या या नगरीत सुबाभुळाची झाडे वगळता दुसरे महत्त्वाचे वृक्ष नाहीत. त्यामुळे पक्ष्यांची घरटी क्वचित सापडतात. डोंगर आणि खाडी यांच्या मधील बेटावर वसलेल्या या शहरातील तापमान हे आजूबाजूच्या शहरातील तापमानापेक्षा कांकणभर जास्त असल्याचे आढळून आले आहे. पालिका सिडको या शासकीय यंत्रणा ढासळत्या पर्यावरणावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण खरी गरज येथील नागरिकांच्या सहभागाची आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेले डोंगर अधिक ओसाड कसे करता येतील हे पाहिले जात असताना ते हिरवेगार करण्याची मानसिकता मात्र येथील नागरिकांच्यात नाही.

मुंबईला पर्याय म्हणून निर्माण करण्यात आलेल्या नवी मुंबईत साठ सत्तर वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणात वनसंपदा होती. येथील आगरी कोळी बांधव या वनसंपदेचा उपयोग उपजीविकेबरोबरच व्यवसायासाठी करीत होते. मुंबईला पर्यायी शहर उभे करण्याच्या नादात राज्य सरकारने येथील नैसर्गिक संपत्तीचा फार मोठय़ा प्रमाणात ऱ्हास केला असल्याचे दिसून येते. पूर्व बाजूला सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिम बाजूस अरबी समुद्राचा भाग असलेला खाडीकिनारा. उत्तर व दक्षिण बाजूस ठाणे व पनवेल ही दोन ऐतिहासिक नगरे अशी भौगोलिक रचना असलेल्या १०८ चौरस किलोमीटर भूभागत प्रथम रासायनिक कारखान्यांची रांग उभी करण्यात आली आणि काही काळानंतर त्यासमोर नागरी वसाहतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या विकासासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड, पाणथळी बुजविणे आणि भराव टाकून भूभाग तयार करण्यात आलेला आहे. एकेकाळी मुंबई, ठाणे येथील जमीनदारांची मिठागरे आणि शेतघरे असलेल्या या भागात आता केवळ सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. हे जंगल उभे करण्यासाठी लागणाऱ्या वाळू, खडी, विटा याच जमिनीच्या उत्खननातून तयार करण्यात आलेली आहेत.

एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांना तर येथील नदी नाले हे एक रासायनिकयुक्त सांडपाणी सोडण्यासाठी चांगले साधन निर्माण झाले. एकत्रित सांडपाणी केंद्र उभारल्यानंतरही खैरणेसारख्या नाल्यात आजही रासायनिक पाणी सोडले जात आहे. पूर्व भागातील डोंगररांगा कापण्याचे काम शासनाने बिनदिक्कतपणे दगडखाण मालकांना दिले. त्यांना वीतभर डोंगर पोखरण्याची परवानगी दिली गेली असता त्यांनी हातभर पोखरून शहराच्या पर्यावरणाचे पार तीन तेरा वाजवून टाकले. त्यामुळे शहरात आजच्या घडीला नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन मोनोक्साईडचे प्रमाण वाढले आहे.

यामुळे नवी मुंबईत हवेतील धुलिकणांचे प्रमाण जास्त आहे. पीएम अडीच आणि पीएम दहा या प्रकारातील धुलिकण असल्याने येथील नागरिकांना दम्याचा त्रास जास्त होत असल्याचे दिसून आले आहे. अस्तित्वात असलेली वनसंपदा नष्ट झाल्याने सोयीनुसार लावण्यात आलेल्या वृक्षामध्ये केवळ पावणे दोन लाख सुबाभुळाची झाडे आहेत. ज्यांचा पर्यावरणाच्या दृष्टीने फारसा उपयोग नाही. चौदा लाख लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ साडेआठ लाख झाडे असून त्यात ही बाभुळांच्या झाडांची संख्या जास्त आहे. पूर्व व पश्चिम बाजूस सह्य़ाद्रीची रांग आणि समुद्राचे खारे पाणी यामुळे येथील तापमानात इतर शहरांच्या तुलनेत जास्त प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. येथील रहिवाशी हे केवळ एका वसाहतीत राहण्यास आल्याने त्यांची या शहराशी नाळ जोडलेली दिसत नाही. त्यामुळे केवळ कामधंद्यापुरता मर्यादित असलेला येथील नागरिक हा पर्यावरणीय चळवळीशी कमी जोडला गेला आहे.

बोटावर मोजण्याइतके आणि तेही मुंबईतून या ठिकाणी ती चळवळ जोपसण्यासाठी काही मंडळींनी कांदळवन आणि प्लेिमगो पक्षी या ठिकाणी यावेत म्हणून पाणथळीच्या जागा जपण्याचे काम सुरू केले आहे. नवी मुंबई पालिकेने मागील वीस वर्षांत शहराची पर्यावरण, नागरी आणि जीवनशैली गुणवत्ता निर्देशांक सुधरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. शहरातील प्रमुख रस्त्याचे सिमेंट कॉँक्रीटीकरण, मुख्य चौकांचे सुशोभीकरण, घनकचऱ्याचे वर्गीकरण, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट, सांडपाण्यावर प्रक्रिया, पिण्याच्या पाण्याचे योग्य क्लोरीनिशन यामुळे पर्यावरण गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. झोपडपट्टी भागाचे आधुनिकीकरण, तेथील शौचालयाची गरज, उद्याने, स्वच्छता, मोकळी मैदाने, कांदळवनाची सुरक्षा, दुभाजकांवरील हिरवळ यामुळे शहराच्या नागरी सुविधा उंचावल्या आहेत. याचा एकत्रित परिणाम या शहराची जीवनशैली इतर शहराच्या तुलनेने जास्त चांगली आहे मात्र हीच सुधारित जीवनशैली शहराला हिरवेगार करण्यास कमी ठरत आहे. शहरात सर्वाधिक वाहन असल्याने वाहन प्रदूषण जास्त आहे. सार्वजनिक वाहतूक सुविधा वाढविणे हा त्यावर उपाय आहे पण तो पूर्ण केला जात नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे येथील खारफुटीवर चालणाऱ्या आगरी कोळयाची कुऱ्हाड (सरपणासाठी लाकूड) ९० टक्के बंद झाली आहे. त्यामुळे २२ किलोमीटरच्या खाडीकिनाऱ्यावर ४९ किलोमीटर परिसरात कांदळवनाचे जंगल मागील पाच वर्षांत चांगलेच फोफावले आहे.  शहरात १६८ प्रकारचे पक्षी, ८० प्रकारचे सरपटणारे प्राणी,१४० प्रकारचे फुलपाखरे, १२५ प्रकाराचे मासे, आणि ८०० प्रकारची फुलझाडे दिसू लागली आहेत. मात्र या जैवविविधतेला जपण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. नवी मुंबईच्या पूर्व बाजूस असलेली डोंगर रांगा पावसाळावगळता अक्षरश: ओसाड पडत असल्याचे दिसून येते. नोसिलसारख्या रासायनिक कारखान्यांने आपले सामाजिक दायित्व जपताना या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते घणसोली येथील गवळीदेव डोंगर परिसरात नेले होते. त्यामुळे या भागात बाराही महिने हिरवळ दिसत होती. ती कंपनी नंतर एका बडय़ा उद्योजकाने विकत घेतली तेव्हापासून गवळीदेव येथील हिरवाई पोरकी झाली. आता केवळ पावसाळ्यात येणारी हिरवळ येथील निर्सग सौंदर्याने नटलेली दिसून येते.

हीच स्थिती बेलापूर येथील पारसिक टेकडीची आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर व धनदांडग्याचे बंगले आहेत. हा डोंगर हिरवागार करण्यासारखा आहे. शहरात येणारे लाखो टन डेब्रिज कुठेही टाकले जात आहे. ते पकडण्यासाठी पालिकेला खास दक्षता पथक नेमावा लागला आहे. त्याऐवजी मुंबई तसेच याच ठिकाणातून निघणारे डेब्रिज या पारसिक टेकडीच्या कुशीत रिकामे करून डोंगरावर पायऱ्याच्या स्वरूपात वृक्षलागवड केल्यास एक चांगले जंगल निर्माण होऊ शकेल. हाच प्रयोग पोखरण्यात आलेल्या १०२ दगडखाणीच्या बाबतीतही करता येण्यासारखा आहे.

डेब्रिज टाकून ह्य़ा दगडखाणीवर नंदनवन फुलवता येण्यासारखे आहे. त्यासाठी एमआयडीसीतील कारखान्यांची मदत घेता येण्यासारखी आहे. नवी मुंबईतील पर्यावरण गुणवत्ता चांगली राहावी यासाठी सिडको आणि पालिकेने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. पण ह्य़ा उपाययोजना काळानुरूप कमी पडत असल्याने ठोस कार्यवाहीची गरज या शहरातील पर्यावरण समतोल ठिकविण्यासाठी आवश्यक आहे.

रहिवाशांची घुसमट

नवी मुंबई पालिकेने मागील २० वर्षांत शहराची पर्यावरण, नागरी आणि जीवनशैली गुणवत्ता निर्देशांक सुधरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, मात्र परिसरातील बेसुमार औद्योगिकीकरण, दगडखाणी, ओसाड पडलेले, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले डोंगर आणि वेगाने वाढलेले शहरीकरण या पाश्र्वभूमीवर रहिवाशांना उत्तम पर्यावरण देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. हवेतील धुलिकणांचे वाढते प्रमाण, औद्योगिक पट्टय़ात वायू आणि रसायनांमुळे पसरलेली दरुगधी, कारखान्यांतून थेट नदी, नाल्यांत सोडले जाणारे सांडपाणी याचा फटका रहिवाशांना बसला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2017 at 04:34 IST

संबंधित बातम्या