पनवेल – कर्करोगी असल्याचे खोटे भासवून रेल्वे तिकीट सवलत मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवाशांकडून अधिक पैसे उकळून रेल्वे प्रशासनाची व शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

रेल्वे तिकीट काढून देणारी टोळी यामध्ये सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, २३ एप्रिलला सायंकाळी सुमारे ६.१० वाजता पनवेल रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटर क्रमांक २ येथे हा प्रकार घडला. आरोपींनी कर्करोगी रुग्णांसाठी मिळणाऱ्या रेल्वे सवलतीचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्र तयार केले. हे प्रमाणपत्र टाटा मेमोरियल सेंटरच्या अधिकृत कागदपत्रांसारखे भासवण्यात आले होते.

त्यावर संबंधित कर्मचाऱ्याची बनावट सही आणि रूग्णालयाचे बनावट शिक्के देखील मारण्यात आले होते. रेल्वे कर्मचा-याच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली.  ३० एप्रिल २०२६ रोजी ‘गोल्डन टेम्पल मेल’ (गाडी क्रमांक १२९०३) मध्ये बांद्रा टर्मिनस ते अंबाला कॅन्ट या मार्गावर दोन प्रवाशांना कर्करोगी रुग्ण म्हणून दाखवून सवलतीचे तिकीट मिळवून देण्यात आले.

प्रत्यक्षात या प्रवाशांकडे चौकशी केल्यावर ते कर्करोगी नसतानाही त्यांच्याकडे बनावट प्रमाणपत्र आढळली. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनासह टाटा हॉस्पिटल व शासनाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. अशा पद्धतीने मागील किती दिवस रूग्णालयाच्या नावाचे बनावट प्रमाणपत्र कितीवेळा वापरण्यात आले.

संबंधित प्रवाशांपर्यंत ही टोळी कशी पोहचते याची चौकशी करत आहे. कर्करोगी रूग्णांच्या नावावर अशापद्धतीने फसवणूक करण्याचा हा पहिलाच गुन्हा खारघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. या गुन्हेगारांना पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे हे करीत आहेत.