scorecardresearch

नवी मुंबई : एपीएमसी बाजारात मेथीच्या दरात घसरण; पालेभाज्या उत्पादकांना फटका

वाशीतील भाजीपाला बाजारात पुणे आणि नाशिक येथून येणाऱ्या मेथीला कमीत कमी ६ ते ८ रुपये आणि जास्तीत जास्त १० रुपये बाजारभाव आहे.

नवी मुंबई : एपीएमसी बाजारात मेथीच्या दरात घसरण; पालेभाज्या उत्पादकांना फटका
एपीएमसी बाजारात मेथीच्या दरात घसरण (संग्रहित छायाचित्र)

डिसेंबर महिन्यात पालेभाज्यांचा स्वस्ताईचा हंगाम सुरु होतो. या हंगामात पालेभाज्या स्वस्त होतात, विशेषकरून मेथी जास्त प्रमाणात आणि कमी दरात उपलब्ध होते. एपीएमसी बाजारात सध्या १ लाख क्विंटलहुन अधिक मेथी बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून चढ्या दराने उपलब्ध असलेली मेथी आता प्रतिजुडी आता ६-८ रुपयांवर उपलब्ध आहेत .किरकोळ बाजारात ही १०-१२ रुपयांनी विक्री होत आहे.

हेही वाचा- उरण : करंजा बंदरातील मच्छीमार बोटीला आग; ५० लाखांचे नुकसान

वाशीतील भाजीपाला बाजारात पुणे आणि नाशिक येथून येणाऱ्या मेथीला कमीत कमी ६ ते ८ रुपये आणि जास्तीत जास्त १० रुपये बाजारभाव आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव कमी झाले आहेत. सप्टेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनाला फटका बसला होता . त्यामुळे बाजारात अत्यल्प आवक होती . आवक कमी झाल्याने बाजारात मेथीचे आणि कोथिंबिरीचे दर गगनाला भिडले होते.

हेही वाचा- नवी मुंबईत दीड लाखांची ई-सिगारेट पोलिसांकडून जप्त; बंदी असूनही मागणीत वाढ

सप्टेंबरमध्ये बाजारात केवळ ५० हजार क्विंटल इतकेच पालेभाज्यांचे आवक होती . त्यामुळे मेथी आणि कोथिंबीर ८० ते १०० रुपयांवर गेली होती. परंतु आता मेथी ६-८रुपये तर कोथिंबीर १५-१६ रुपयांवर उपलब्ध आहे. हिवाळा सुरू झाला असून थंडीची चाहूल लागली आहे. पालेभाज्यांसाठी थंडीचे वातावरण पोषक असते. थंड हवेत पालेभाज्यांना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे या हंगामात पालेभाज्यांचे उत्पादन जास्त होते. त्यामुळे आता पालेभाज्यांचे भरघोस उत्पादन निघत असून एपीएमसी बाजारात आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बाजारात कोथिंबिरीची २ लाख १२ हजार क्विंटल आवक आहे. तर मेथीची १ लाख ३९ हजार ५०० क्विंटल आवक आहे. त्यामुळे दर उतरले असून स्वस्त मेथीचा हंगाम सुरू झालेला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 15:47 IST

संबंधित बातम्या