उरण : तालुक्यातील चिरनेर आणि परिसरातील दगडखाणींमुळे येथील नगदी फळ पिके असलेल्या आंबा, जांभूळ आणि नारळांच्या फळे आणि वृक्षांना धोका निर्माण झाला असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या परिसरात अनेक दगडखाणी असून त्याचा परिणाम आंबा पिकांवर तसेच कडधान्य व भात पिकांवरही झाला आहे. येथील ठेकेदारांनी दलालांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या डोंगरप्रवण जमिनी खरेदी करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे एक दोन वर्षातच येथील निसर्ग वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. येथे सुरू असणाऱ्या दगडखाणींतील रात्रीच्या स्फोटांच्या आवाजाने येथील नागरिकांची झोपमोड होते. हवेत धूलिकण पसरून प्रदूषणही वाढले आहे.

फळझाडांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्रोत आर्थिक लाभ देणारा ठरत असल्याने गेल्या काही वर्षांपासून उरण तालुक्यातील चिरनेर भागात फळपीक लागवड क्षेत्र विस्तारत आहे. कोकणची माती ही फळ पिकासाठी उत्तम असल्याने पारंपरिक शेतीच्या जोडीला शेतीचे बांध, पडिक माळराने यांच्यावर फळपीक लागवड क्षेत्र वाढविण्याकडे शेतकरी प्रयत्नशील आहेत. कोकणपट्टीत फळ पिकांमध्ये सर्वोत्तम ठरलेल्या हापूससह केशर आंबा, पेरू, जांभूळ, पपई या फळझाडाला पोषक हवामान आहे. शासनाने निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन परिसरातील शेतकऱ्यांनी केले आहे.

दगड खाणीतील धूलिकणांमुळे आंब्याच्या मोहरावर परिणाम होत आहे. त्यामुळे फळांची वाढ खुंटू लागली असून स्फोटांच्या हादऱ्यामुळे वृक्षांच्या मुळांनाही धोका निर्माण झाला आहे. दुसरीकडे वाढत्या वानरांच्या उच्छादामुळे शेकडो आंबे वाया जात आहेत. त्यामुळे सुरक्षा म्हणून माती उत्खनन आणि खाण चालकांनी येथे पाण्याचा शिडकावा करण्याची आवश्यकता आहे.
महेंद्र मोकल, शेतकरी