नैसर्गिक आणि आधुनिक पद्धतीचा मेल घालून फायद्याच्या शेती उत्पादनाच्या शोधात चिरनेर येथील महागणपती सेंद्रिय शेती गटाच्या शेतकऱ्यांनी १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत पालघर येथे शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी येथील विविध ठिकाणच्या शेती उत्पादन बागांना भेटी देऊन अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करण्यात आले. तीन दिवसीय शेती अभ्यास दौऱ्यासाठी पालघर येथील शेतकऱ्यांच्या बागांची निवड करण्यात आली होती. यात १३ शेतकरी व दोन कृषी सहाय्यक अधिकारी यांनी आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी माहीम पालघर येथील शेतकरी जयंत (आप्पा) वर्तक यांच्या कल्पवृक्ष बागेस भेट देण्यात आली. यावेळी त्यांनी यांत्रिकीकरणावर मार्गदर्शन करून ,नारळ ,सुपारी व केळी यांच्या फळ धारणेपासून पाणी व खतांचे व्यवस्थापन ,बागेचे संवर्धन आदी विषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच जयंत वर्तक यांनी शेतकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील केली होती. डहाणू वानगावचे कृषी भूषण शेतकरी यज्ञेश शहा यांनी ड्रीप वरच्या मिरची लागवडीची विस्तृत माहिती दिली. पालघर येथील कृषी भूषण शेतकरी विजय माळी यांनी अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना कृषी पर्यटन व चिकू लागवड याविषयीचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले. अर्चना राऊत यांच्या मधुमक्षिका व चिकू लागवड बागायतीला भेट देऊन, त्यांच्याकडून संपूर्ण उत्पादन प्रक्रिया आणि त्याची विक्री याबाबत माहिती जाणून घेतली. तर अच्युत्य पाटील यांच्या चिकूच्या बागेस भेट देऊन फळ काढण्यापासून फळ प्रक्रिया सोबत त्यांच्या विक्रीपर्यंतची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिली. सचिन चुरी यांनी पानवेलीची माहिती देऊन या पानाच्या विशिष्ट चवीमुळे सौराष्ट्र व गुजरात येथून या पानाला विशेष मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा >>>नवी मुंबई : सी.डब्ल्यू.सी.च्या पोलारीस लॉजिस्टिक विरोधात नोकरीसाठी भूमिपुत्र कामगारांचे उपोषण
माणिक वर्तक यांच्या निमखाऱ्या जमिनीवर मॅचलिंग पेपर टाकून, त्यांनी लागवड करण्यात आलेल्या विविध जातीच्या मिरचीच्या बागायतीला भेट देण्यात आली. तर महेंद्र देसले यांच्या शेडनेट मध्ये तीन एकरावर करण्यात आलेल्या वांगी लागवडीला भेट देण्यात आली. कल्पक चौधरी यांनी आलू लागवड व दूधडेरीवर मार्गदर्शन केले .तर डहाणू येथील आदिवासी शेतकरी गणपत भुजाडा यांनी शेततळ्यात पालन केलेल्या रोहू कटला फंटूसमासा यांच्या उत्पादनाविषयी माहिती दिली .सांगी वाडा येथील कृषी भूषण शेतकरी अनिल पाटील यांनी पिवळा कलिंगड ,टरबूज नर्सरी आणि यंत्राद्वारे भात लागवडीची माहिती दिली. इको विलेज व नकुलदास यांनी काळाची मागणी लक्षात घेऊन देशी गोसंगोपणाला सुरुवात केली असून, गीर गाई प्रायोगिक तत्त्वावर घेऊन ,गाईंसाठी मुक्त गोठा बांधला आहे. गाईंना दोन वेळा चारा दिला जात असून, चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले .यावेळी कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील, कृषी सहाय्यक अधिकारी निखिल देशमुख, कृषी सहाय्यक अधिकारी सुरज घरत यांनी शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीबरोबरच उत्पादकता शेतमालाचा दर्जा, कृषी प्रक्रिया, कृषी उत्पादनाचे ग्रेडिंग प्रतवारी, साठवणूक, पॅकेजिंग व ब्रँड विकसित करणे ,शेतमालाचे यशस्वी विषणन करणे यावर भर देण्याची आवश्यकता आहे. यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होणे तसेच ते प्रत्यक्ष पाहणे. या दृष्टीने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.