शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पिकवलेला माल थेट शहरी ग्राहकांपर्यंत विकता यावा यासाठी सरकारने पणन परवाने थेट शेतकऱ्यांना दिले; मात्र याला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी आणि अडत्यांनी जोरदार विरोध केला असून सरकारने हा निर्णय कायम ठेवल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. याला माथाडी कामगारांनीही आपला पाठिंबा दर्शवला आहे. यासाठीच या संदर्भातील रूपरेषा ठरविण्यासाठी माथाडी कामगार, व्यापारी आणि अडते यांनी १२ जानेवारी रोजी काम बंद करून मुंबईत बैठक आयोजित केली आहे.
यासाठी राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितींतील व्यवहार काही दिवस बंद करण्याची तयारी सुरू आहे. आमदार नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्याशी व्यापाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. थेट पणनाची सोय झाल्यास शहरातील गृहनिर्माण संस्थांना वाजवी दरात कृषिमाल मिळेल, असा सरकारचा यामागचा उद्देश आहे. मात्र या धोरणामुळे माथाडींचे मोठे नुकसान होईल, अशी भीती कामगार नेत्यांनी व्यक्त केली आहे.
अनेक वर्षांपासून कृषी बाजार उत्पन्न समितीच्या आधारावर माथाडींचे पोट भरत आहे. त्यांच्या जगण्याचा तो मुख्य आधार आहे, असे नेत्यांनी स्पष्ट केले.