‘नैना’ ला विरोध करण्यासाठी शेतकरी सिडको भवनावर, भाजी भाकरीसह आंदोलकांची वाहनफेरीत

या सपूर्ण आंदोलनादरम्यान पनवेलच्या सामान्य शेतक-यांच्या शिस्तीचे प्रतिक गुरुवारी पाहायला मिळाले.

protestors
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

पनवेल: नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील (नैना) २३ गावांतील ग्रामस्थ गुरुवारी आंदोलनासाठी घराबाहेर पडले ते स्वताजवळ असणाऱ्या वाहनाने आणि घरातील भाजीभाकरी घेऊन. जवळची भाजी भाकरी गुरुवारी बेलापूर येथील रायगड भवनासमोरील मैदानात आंदोलक ग्रामस्थ एकजुटीने खाण्याचे नियोजन होते. आंदोलकांचे नियोजन बेलापूर येथील सिडको भवनाला घेराव घालण्याचे होते. मात्र नवी मुंबई पोलीसांनी आंदोलक सिडको भवनापर्यंत पोहचू नये यासाठी सिडको भवनापर्यंत जाणारे सारेच मार्ग बंद केल्याने आंदोलकांची वाहन फेरी सिडको भवनापर्यंत पोहचण्यासाठी 8 किलोमीटरचा वळसा मार्ग आंदोलकांना घ्यावा लागला. पोलीसांनी आंदोलकांचा सिडको भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र या सपूर्ण आंदोलनादरम्यान पनवेलच्या सामान्य शेतक-यांच्या शिस्तीचे प्रतिक गुरुवारी पाहायला मिळाले.

सूमारे दिड हजारांहून अधिक वाहने त्यामध्ये विविध गावातील ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असा आंदोलकांचा जत्था बेलापूरकडे रवाना झाला. खांदेश्वर, कळंबोली सर्कल, कामोठे, खारघर येथे विविध ग्रामस्थ या वाहनफेरीत जोडले गेले. ग्रामस्थांनी पनवेल शीव महामार्ग रोखू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दुपारी एकवाजेपर्यंत ही वाहनफेरी पनवेल शीव महामार्गावरुन बेलापूर वसाहतीकडे जाणार असल्याने पोलीसांची कुमक महामार्गावर ठिकठिकाणी दिसत होती. पनवेल शीव महामार्गावरुन थेट बेलापूर येथील सिडको भवनाचा मार्ग पहिल्यांदा बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरीधर गोरे व पथकांनी रोखून धरला. त्यानंतर बेलापूर येथील उड्डाणपुलावरुन आंदोलकांची वाहने अपोलो रुग्णालयाच्या मार्गाकडे जात नाही तोपर्यंत पनवेल शीव महामार्गाची वाहतूक बेलापूर उड्डाणपुलावर रोखण्यात आली होती. त्यामुळे बेलापूर ते खारघर या पल्यावर वाहनांच्या दोन किलोमीटरच्या रांगांमध्ये सामान्य प्रवाशांचे हाल झाले.

आणखी वाचा- ‘नैना’ ला विरोध करण्यासाठी शेतकरी सिडको भवनावर धडकले

बेलापूर अपोलो रुग्णालयाकडून पामबीच मार्गावरुन बेलापूर वसाहतीमध्ये आंदोलकांनी प्रवेश करावा असे नियोजन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा दिवाळे गावासमोरील सिडको भवनाकडे जाणा-या उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आंदोलक थेट सिडको भवनापर्यंत जाऊ नये असे नियोजन नवी मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केले होते. आंदोलकांची वाहने आणि आंदोलकांना स्थिरावण्यासाठी रायगड भवनासमोरील मोकळ्या जागेत सोय करण्यात आली होती. सकाळ भवन ते सिडको भवन हा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. सर्वच वाहनांना बेलापूर वसाहतीमधून गुरुवारी प्रवास करावा लागला. आंदोलकांना पाण्याच्या बाटल्या. भाकरी आणि भाजी असे जेवणाचे नियोजन विविध गावच्या ग्रामस्थांनी केले होते. प्रत्येकाने येताना भाकरी घेऊन यावे असे आवाहन आंदोलनाच्या नियोजनकारांनी केले होते. दुपारी रायगड भवनासमोर हे आंदोलक एकवटणार असल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त उभारण्यात आला होता. पोलीसांनी आंदोलनाच्या वाहनांची दिशा बदलल्याने सिडको भवनाला घेराव घालणा-या आंदोलकांना स्वताच्याच वाहनाचा घेराव घालून रायगड भवनापर्यंत यावे लागले.

नवी मुंबई पोलीस विभागाचे तीन पोलीस उपायुक्त, आंदोलनाचा मार्ग असणाऱ्या सर्वच पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक स्थानिक कर्मचारी वाहतूक विभागाचे कर्मचारी या आंदोलनात बंदोबस्तासाठी पनवेल शीव महामार्गावर ५० मीटरवर तैनात केले होते. खांदेश्वरपासून निघालेल्या वाहनफेरीमुळे पनवेल शीव महामार्गावरील वाहनांना त्रास होऊ नये म्हणून उड्डाणपुलावरुन आंदोलकांच्या वाहनांचा प्रवास टाळण्यात आला होता. निषेधाचे काळे, लालबावट्याचे लाल आणि पांढऱ्या कपड्यावर रक्तरंजित लाल टिपक्यांचे असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे लावून आंदोलक सिडको विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनात शांततेत उतरले होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 15:52 IST
Next Story
उरण: रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी धुतुम ग्रामस्थांचा मोर्चा
Exit mobile version