पनवेलमध्ये सध्या दहशतीचे साम्राज्य आहे. एका इंग्रजी दैनिकाचे वार्ताहर सुधीर सूर्यवंशी यांना मारहाण झाल्याच्या घटनेने अनेक जण सध्या भयाच्या सावटाखाली वावरत आहेत. बडे ठेकेदार या हल्ल्यामागे असावेत, असा पोलिसांना संशय आहे. या ठेकेदारांना अर्थातच राजकीय आशीर्वाद लाभला आहे. आजवर सिडकोच्या आधिपत्याखाली असलेल्या शहरात पोलिसांचा काही वचक राहिला आहे का, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे भविष्यात हे शहर दहशतीसाठीच ‘स्मार्ट’ राहील का, याची भीती आहे.

नवी मुंबई, उरण व पनवेल तालुक्यातील स्थानिक नागरिकांच्या जमिनी सरकारने जबरदस्तीने बळकावल्या आणि त्यांचे पुनर्वसन मात्र टाळले. त्यावर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी व्यासपीठावरून उच्चरवाने मांडले आहे. साडेबारा टक्के जमिनी स्थानिकांच्या ताब्यात दिल्या असल्या तरी त्यातून निर्माण होणारी सामाजिक समस्या निवारण्यासाठी सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. आज ग्रामस्थांमध्ये एक प्रकारचा राग आहे. शहरात नोकरदार आले. उच्च विद्याविभूषितांनी येथे येऊन आर्थिक प्रगती केली; मात्र येथील जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी सामाजिक विषमताच अद्याप कायम आहे. विकासाच्या कक्षेत या साऱ्यांना सरकार सामावून घेऊ शकलेले नाही. स्थानिकांची काही मुले उच्चशिक्षण घेऊन मोठय़ा पदावर कामाला आहेत; तरीही ‘विकासक’ होण्याच्या पनवेलच्या संस्कृतीत तिसरी पिढी रमली आहे आणि त्यांच्यात विकासाची महत्त्वाकांक्षा वाढीस लागली आहे.

यातील बुद्धीऐवजी भावनेचा अधिक वापर करणाऱ्यांनी बाजी मारली. तीन वर्षांपूर्वी क्रिकेट सामन्यादरम्यान दहशत माजविण्यासाठी जुई गावातील तरुणाने हवेत गोळीबार केला होता. अखेर पोलिसांनी या घटनेतील संशयिताला अटक केली आणि त्याला वातानुकूलित गाडीतून न्यायालयात हजर केले. यावरून पनवेलमधील पोलिसांचा दबदबा लक्षात येतो.

पत्रकारांना तर यात मोठय़ा प्रमाणावर लक्ष्य करण्यात आले आहे. पत्रकारांच्या तोंडाला काळे फासण्याची धमकी देणे, प्रसंगी जाळून टाकण्याची भाषा करणे, मारहाण करणे, फोनवरून धमक्या देण्याचे सत्र पनवेलमध्ये नेहमीच चालते. ही दहशत पसरविण्यात राजकीय पुढारी आणि कंत्राटदारही आघाडीवर आहेत. परंपरा आहे. कल्पतरू सोसायटीमधील पत्रकार सूर्यवंशी यांनी कोणासोबत मैत्री करावी आणि कोणाविरोधात बोलावे यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाला आहे असे चर्चेत आहे. याच परिसरात राहणारे सुनील बहिरा हे शेतकरी कामगार पक्षाचे त्यांच्याशी पत्रकार सूर्यवंशी यांचे वैचारिक सूत जुळले आणि त्यामुळेच सूर्यवंशी हे भाजपच्या विरोधी गटात नावडते झाल्याचे बोलले जाते. जो माझ्या विरोधकांच्या समूहात आहे, तो माझा विरोधक. अशा लघुमनोवृत्तीमधून सूर्यवंशी यांच्याविषयी सोसायटीमध्ये मतप्रवाह उभा राहिला. विशेष म्हणजे पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामधील गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये असे सूर्यवंशी वृत्तीचे अनेक नागरिक आहेत. मुंबईतील अनेक चाकरमान्यांनी पनवेलपर्यंत लोकलची सीमा विस्तारल्यामुळे व कमी भावात घरांच्या किमती असल्यामुळे त्यांनी पनवेलमध्ये राहायला पसंती दाखविली. मात्र या परिसरात राहण्यास आल्यावर त्याला टोलेजंग इमारतीमागचे दहशतीचे गूढ रहस्य समजते. दूध, भाजी, नारळपाणी, फळे या शहरीभागातील व्यवसायावर आजही काही स्थानिकांची मक्तेदारी आहे. घरात येणाऱ्या दुधाच्या छापील पिशवीवरील किमतीचा व दूध देणाऱ्या व्यापाऱ्याला याचा वाढीव दर मोजावा लागतो. अर्थात तो व्यापारी रहिवाशांच्या खिशातून तो स्थानिक दर वसूल करतो. दूध, केबल अशा अनेक व्यवसायांवर याच स्थानिकतेची छाप दिसते. सामान्य चाकरमानी या विषयी आवाज उठवायला गेल्यावर त्याला येथील स्थानिकांचे कायदे समजवले जातात. नाही ऐकला तर बेस बॉलच्या लाकडी दांडय़ाचे फटके सूर्यवंशी यांच्याप्रमाणे दिले जातात. स्वत:ला या सगळ्यांपासून दूर ठेवणारे या स्थानिकांना आपले शेठ माणतात. तर काही जण त्यांच्याविरोधात काही मोट बांधता येते का याचा प्रयत्न सुरू करतात. अर्थात ही मोट मागील २५ वर्षांत बांधली गेली नाही. तसा आवाज एकत्र झाला नाही हेच वास्तव आहे. स्थानिकांच्या दंडुकेशाहीला सर्वच राजकीय पक्षांचा वरदहस्त असल्यामुळे हे सर्व शक्य होते. सर्वच राजकीय पक्षांमधील तालुक्याच्या व जिल्ह्य़ाच्या पदावर याच स्थानिकांचा कब्जा आहे; परंतु सर्वच स्थानिक दंडुकेशाहीचे समर्थन करणारे नाहीत. यापूर्वी या परिसरात शेकापचा एकटय़ाच्या दंडुका चालायचा, असे शेकाप नेते छातीठोकपणे सांगतात. पण रामशेठ ठाकूर यांनी शेकापला आव्हान दिल्यावर शेकापला कडवट विरोध त्यांच्याच भाषेत करणारे ठाकूर घराणे हे एकमेव होते. त्यामुळे शेकापच्या दंडुक्यांनी हैराण झालेले अनेक जण ठाकूरांच्या पंज्याच्या सावलीत गेले. सध्या पनवेलच्या राजकारणात दोनच कुटुंबांभोवती महापालिकेची निवडणूक फिरतेय. रामशेठ ठाकूर व विवेक पाटील यांच्यातील हा वाद आहे. पत्रकार सूर्यवंशी यांच्या हल्यामुळे ठाकूर कुटुंबीयातील सदस्याचे नाव येणे व त्याला अटक होणे ही पहिल्यांदाच घडलेली घटना आहे. निवडणुकीपूर्वी स्थानिक विरुद्ध बाहेरवाले असा वाद धुमसणे हे दोन्ही राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांना परवडणारे नाही. ज्यांना हे स्थानिक बाहेरवाले म्हणून हिणवतात तेच ६५ टक्के मतदार या पालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवतील अशी भीती या राजकीय पक्षांच्या शिलेदारांना आहे. २० वर्षांचा शेजार असलेले पनवेलचे सुसंस्कृत कुटुंब स्थानिक नेत्यांना आपले वाटत नाहीत, तर वर्षांनुवर्षे एकत्र जेवलेले याच निवडणुकांमध्ये महत्त्वाकांक्षेपोटी प्रतिस्पध्र्यासारखे व्हॉट्सअ‍ॅपवरील फलकयुद्ध करत आहेत. अनेक सुजाण नागरिकांनी स्थानिकांच्या दादागिरीला वैतागून आपले व्यवसाय बंद केले, राजकीय कारकीर्द थांबविली, तर काहींनी फोफावलेल्या दहशतवादाला कंटाळून पुन्हा मुंबईत स्थिरावणे पसंत केले.

हम करेसो कायदा.. ही वृत्ती बदलून ‘मी आणि आम्ही’ या सर्वसमावेशक संस्कृतीची जपणूक स्मार्ट शहरात होणे गरजेचे आहे. समोरील व्यक्तीचा वैचारिक विरोधाला वैचारिकतेने तोंड देणे ही शिकवण घरातील ज्येष्ठांनी, शहरातील नेत्यांनी आणि तालुक्याचा राजकीय पक्ष चालविणाऱ्यांनी आचारणात आणली पाहिजे. तरच असे हल्ले होणार नाहीत. यासाठी प्रत्येकाने विवेकाने वागले पाहिजे.

पत्रकारांनीही तत्त्वे पाळणे गरजेचे

पत्रकारांची पाकिट पत्रकारिताही गेल्या काही वर्षांपूर्वी चर्चेत होती. त्याचे पितळ उघडे करण्यात आल्यानंतर काही पत्रकारांच्या गटाने ‘शोध पत्रकारिते’ची कास धरणाऱ्या काही पत्रकारांना खडय़ासारखे वेगळे केले. त्यांच्याशी सहकार्य न करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे पत्रकारांच्याही विश्वासार्हतेवर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकारांनी सचोटी आणि धैर्य यांच्या बळावर पत्रकारिता करणे सुदृढ समाजासाठी आवश्यक आहे. त्यासाठी काही तत्त्वे त्यांनी आचरणात आणणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या पाकिट पत्रकारितेचा लोकांना तिटकारा आहे. त्याचा अनुभव नवी मुंबईकरांनी गेल्या कांही वर्षांपूर्वी घेतला होता. या शहरातील ही परंपरासुद्धा नष्ट होणे गरजेचे आहे.