एकगठ्ठा मतांसाठी लक्ष्मीदर्शन

निवडणुकीस अवघे आठ दिवस बाकी असल्याने एकगठ्ठा मतांसाठी लक्ष्मीदर्शन घडवले जात असल्याची जोरदार चर्चा आहे.

ग्रामपंचायत निवडणूक

उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीस अवघे आठ दिवस बाकी असल्याने एकगठ्ठा मतांसाठी लक्ष्मीदर्शन घडवले जात असल्याची जोरदार चर्चा आहे.
या निवडणुकीत गावोगावच्या तरुण तसेच महिला मंडळातील सदस्यांची एकगठ्ठा मते मिळावीत याकरिता उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याकरिता मंडळाचे सदस्य असलेल्यांची मतदार यादीतील नावे तपासून उमेदवाराच्या प्रतिनिधींकडून मंडळांना देणग्या देण्यासही सुरुवात झाली आहे. या निमित्ताने युवक व महिला मंडळांना भरघोस निधी मिळण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच कला, क्रीडा या माध्यमांतून गावागावांतून तसेच शहरातूनही तरुणांची मंडळे स्थापन झाली आहेत.
या मंडळांना निवडणुकीच्या काळात सुगीचे दिवस येतात. मंडळातील कार्यकर्त्यांची मते आपल्याला मिळावीत, यासाठी सर्वपक्षीय उमेदवार प्रयत्न करीत आहेत. सर्वच उमेदवारांकडून मागणी असल्याने ‘जास्तीची बोली’ लावणाऱ्या उमेदवाराच्या पारडय़ात मते पडतील असे दिसते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Felt money in gram panchayat elections