तयारीला वेग; सुमारे दीड लाख प्रेक्षक येण्याची शक्यता

तीन महिन्यांवर आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय फिफा फुटबॉल स्पर्धे’च्या तयारीने वेग घेतला आहे. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी मंगळवारी या स्पर्धेचा आढावा घेतला. या स्पर्धेतील चार सामने नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमध्ये होणार आहेत. उपान्त्य फेरीही याच स्टेडियममध्ये होईल. स्पर्धेच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू झाली आहे.

फिफाच्या १९ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद यंदा भारताला मिळाले आहे. त्यामुळे देशाच्या विविध शहरांत हे सामने खेळविले जातील. नवी मुंबई नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमची यासाठी निवड करण्यात आली आहे. या स्टेडियमध्ये ६ ऑक्टोबरपासून सामने सुरू होणार आहेत. ९, १२, १८ व २५ ऑक्टोबरला हे सामने होतील. यात १८ ऑक्टोबर रोजी होणारी उपउपान्त्य फेरी व २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपान्त्य फेरीचा समावेश आहे. या खेळाडूंसाठी सराव मैदान पालिका नेरुळ व सीबीडी येथे तयार करत आहे. त्यासाठी पालिकेने सहा कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवली आहे. फिफाचे काही सामने नवी मुंबईत होणे हे शहराच्या दृष्टीने भूषणावह असल्याने पालिका प्रशासनाने सर्व तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

या सामन्यांसाठी जगभरातून एक लाख प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमची क्षमता ६५ हजार प्रेक्षकांची आहे. त्यामुळे वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडणार आहे. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी मंगळवारी संबंधित सर्व घटकांची डी. वाय. पाटील संकुलात एक संयुक्त बैठक घेतली आणि काही सूचना केल्या आहेत. या सामान्यांची ऑनलाइन तिकिटविक्री सुरू झाली आहे.