नवी मुंबई : लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर आघाडीवर राहिलेल्या नवी मुंबईत लसीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. शहरात सर्व वयोगटातील मिळून १२ लाख २७ हजार ८३२ लाभार्थी असून यापैकी ११२ टक्के पहिल्या तर ९९ टक्के दुसऱ्या लसमात्रचे लसीकरण झाले आहे.
दरम्यान, शहरात करोनाच्या संख्येत चढ-उतार होत आहेत. त्यामुळे काहीशी चिंता आहे. मात्र बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले असल्याने घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करोना ‘टास्क फोर्स’च्या पथकाने केले आहे. १६ जानेवारी २०२१ पासून देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने राज्यात सर्वात प्रथम १४ महिन्यांतच १८ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण केले होते. यात नवी मुंबई हे राज्यातील पहिले शहर ठरले होते. ११ लाख ७ हजार नागरिक दोन्ही लसमात्रा घेऊन लसवंत झाले आहेत. तसेच १२ ते १४ आाणि १५ ते १८ वयोगटातील लसीकरणातही आघाडी घेतली आहे.
शहरात १५ ते १८ वर्षांवरील किशोरवयीन विद्यार्थ्यांचे पहिल्या लसमात्रेचेही १०० टक्के तर दुसरी मात्रा ८६.७२ टक्के पूर्ण झाली आहे. तर १२ ते १४ वयोगटात पहिली मात्रा ८१ टक्के तर दुसरी मात्रा ५४.७४ टक्के पूर्ण करण्यात आली आहे. एकूण लसीकरणात शहरातील ११२ टक्के पहिल्या तर ९९ टक्के दुसऱ्या लसमात्रेचे लसीकरण झाले आहे.
नवी मुंबई महापालिकेने जास्तीत जास्त लसीकरण केंद्र करून हर घर दस्तक, कवचकुंडल यांसारखे विविध उपक्रम राबवल्यामुळे लसीकरणात शहर आघाडीवर आहे.
नवी मुंबई शहरात पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन केल्यामुळे शहरात इतर महापालिकांच्या तुलनेत चांगले लसीकरण करण्यात आले आहे. अद्यापही ज्या नागरिकांची दुसरी लसमात्रा घेणे बाकी आहे त्यांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊन महापालिकेला सहकार्य करा असे आवाहन लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी केले आहे.