नवी मुंबईतील आंदोलनात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह भाष्य केल्याने नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अशोक गावडे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आघाडीच्या पक्षांनी नवी मुंबईत शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) निदर्शने केली. यावेळी अशोक गावडे यांची जीभ घसरली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशोक गावडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीविषयी अश्लाघ्य भाषा वापरली. याचे पडसाद नवी मुंबईत उमटले. नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा आमदार अनुक्रमे मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांनी अशोक गावडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाशी पोलीस ठाणे आणि पोलीस उपायुक्त कार्यालय गाठले. ही घटना घडल्यानंतर अशोक गावडे यांनी त्याच रात्री १० वाजता पत्रकार परिषद घेत माफीही मागितली होती.

हेही वाचा : वाइन विक्री: “मविआ सरकारमधील अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं की…”, अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

या प्रकारावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शशिकांत शिंदे यांनीही समाजमाध्यमातून दिलगिरी व्यक्त केली. मात्र भाजप नेत्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आणि वाशी पोलीस ठाण्यात कलम ५०९ नुसार महिलेस लज्जा वाटावी, तिला अपमानित करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या घटनेने ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अडचणीत आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against accused who use objectionable language for amruta fadnavis pbs
First published on: 26-02-2022 at 21:39 IST