नवी मुंबई : एपीएमसीतील फळ बाजारात हापूसचा हंगाम सुरू असून लाकडी पेटय़ा व गवताला आगीच्या किरकोळ घटना घडत असल्याने पुन्हा एकदा अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाचही बाजारात एकही अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्याने मोठी हानी पोहचू शकते. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने व्यापाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
देशातील सर्वात मोठय़ा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक नसल्याने या ठिकाणी अनेक अवैध धंदे होत असतात. त्याच प्रमाणे अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याने येथील सुरक्षा नेहमीच ऐरणीवर असते.
आता फळ बाजार समितीत सध्या हापूसचा हंगाम सुरू झाला असून बाजारात ३० ते ३२ हजार पेटय़ा दाखल होत आहेत. मात्र पाचही बाजार परिसरात एकही अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. सर्वच बाजारात मोठय़ा प्रमाणात शेतमाल येत असतो. विशेषत: भाजीपाला आणि फळ बाजारात अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. फळ बाजारात लाकडी पेटय़ा आणि गवत मोठय़ा प्रमाणावर येत असून आगीच्या घटना घडत आहेत. मात्र या ठिकाणी एपीएमसी बाजाराची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा ही अस्तित्वात नाही तसेच अग्निशमन सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल व्यापारी करीत आहेत.
फळ बाजारात एकूण १०२९ गाळे आहेत. आडत्या गाळा धारक १०११ व बिगर आडत्या गाळा धारक ३८० असून या बाजारात दोन बहुउद्देशीय इमारती असून या ठिकाणी काही बँका, पतपेढय़ा, माथाडी बोर्डाचे कार्यालय, मालमत्ता नोंदणी कार्यालय तसेच काही खासगी कार्यालये आहेत. या पूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. एपीएमसीत परवानगीअडून अनेक व्यापारी राजरोस लाकडी पेटय़ा व गवताचा बेकायदा साठा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.
एपीएमसीची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. फळ बाजारात हापूस हंगामात लाकडी पेटय़ा आणि गवत मोठय़ा प्रमाणावर येत असते. यादरम्यान काही ठिकाणी आगीच्या घटनाही घडत असतात. मोठी दुर्घटना घडू नये याकरिता एपीएमसीची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा काळाची गरज आहे. – संजय पिंपळे, व्यापारी, फळ बाजार