नवी मुंबई : नगर येथील रुग्णालयातील आग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील सर्व खासगी तसेच महापालिका रुग्णलयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी सुरू केली आहे. पुढील आठ दिवसांत १४ अधिकाऱ्यांचे पथक शहरातील सर्व रुग्णालयांना भेटी देणार असून तपासणी करणार आहेत.

यात खासगी २१९ रुग्णालयांसह महापालिकेची पाच रुग्णालये व २३ नागरी आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे. यात कायमस्वरूपी आग विझविण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे का? अग्निशमन पंप सुरू आहे का? स्प्रिंकल्स आहेत का? आदी यंत्रणांबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

एप्रिल महिन्यात ५१ रुग्णालयांची झाडाझडती घेण्यात आली होती. त्यात ४० पैकी ३१ रुग्णालये पूर्ण क्षमेतेने सुरू होती. मात्र उर्वरित रुग्णालयात त्रुटी आढळ्या होत्या. मात्र त्या त्रुटी दूर केल्याचा अहवालही देण्यात आला आहे असा दावा अग्निशमन विभागाने केला आहे.  दर सहा महिन्याला रुग्णालयांनी महापालिकेला अहवाल देणे क्रमप्राप्त आहे तर महापालिकेनेही रुग्णालयांची तपासणी करणे बंधनकारक आहे.

नगर येथील रुग्णालयातील आग दुर्घटनेच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागाने शहरातील खासगी रुग्णालयांसह महापालिका रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणी सुरू केली आहे.

-पुरुषोत्तम जाधव, अग्निशमन विभागीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका