घनकचरा व्यवस्थापनात मागे पडल्याने स्वच्छ अभियानातील पंचतारांकित मानांकन

विकास महाडिक
नवी मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्पर्धेत नवी मुंबई पालिकेने देशातील चार शहरांच्या यादीत ‘वॉटर पल्स’ या प्रकारात सर्वोच्च मानांकन मिळविल्याने घनकचरा व्यवस्थापनात सप्त तारांकित मानांकन मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र नवी मुंबईला हे मानांकन न मिळता पंच तारांकित मानांकन मिळाले असल्याचे समजते. हागणदारी मुक्त, घनकचरा व्यवस्थापन आणि शहराचे सौंदर्यीकरण अशा तीन प्रकारात सर्वोच्च मानांकन मिळाल्यानंतरच देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळण्याचे निकष पूर्ण होत आहेत. नवी मुंबई पालिकेला घनकचरा व्यवस्थापनातच सप्तऐवजी पंच तारांकित मानांकन मिळाल्याने ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे पालिकेने गेली वर्षभर आळवलेले घोषवाक्य मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेली दीड वर्षे करोना साथीचा मुकाबला करीत असताना नवी मुंबई पालिकेने स्वच्छ भारत अभियानात पहिला क्रमांक पटकाविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यासाठी ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे ब्रीद वाक्य घेऊन शहराचे सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी जे. जे.सारख्या कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने यंदा केलेल्या विविध सर्वेक्षणांत नवी मुंबई पालिकेने पाण्याचे स्रोत आणि त्यांचा वापर या प्रकरणात केलेली प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नवी मुंबईतील सर्व सार्वजनिक शौचालयातील स्वच्छता आणि हागणदारी मुक्त शहर करण्यासाठी पालिकेने केलेले प्रयत्न या सर्वेक्षणात गृहीत धरण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे पालिकेने सांडपाण्यावर आठ केंद्रांद्वारे प्रक्रिया केली असून, काही प्रमाणात पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. शहरातील उद्याने तसेच दुभाजकांवरील हिरवळ या प्रक्रियायुक्त पाण्यावर जोपासली जात आहे. त्यामुळे पालिकेने सांडपाणी किंवा स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे पाणी याचा योग्य वापर केल्याने पालिकेने वॉटर प्लस या प्रकारात सर्वोच्च मानांकन मिळविले आहे. या यादीत इंदौर, सुरत आणि नवी दिल्लीदेखील अव्वल आलेले आहेत, मात्र या मानांकन स्पर्धेत नवी मुंबईला टाळणे शक्य नसल्याने वॉटर पल्समध्ये हे शहर सर्वोच्च मानांकन प्राप्त करू शकले आहे. या प्रकारात नवी मुंबई कायम आल्याने पुढील स्पर्धेत टिकून राहण्याच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या, मात्र पुढील घनकचरा व्यवस्थापन अर्थात साफसफाई या प्रकारात पालिकेला यंदा सप्त तारांकित मानांकन अपेक्षित होते, पण हे सर्वेक्षण केंद्र सरकारच्या पथकाने सप्तऐवजी पंच तारांकित ठरविले असल्याने पालिकेचा निश्चय केला नंबर पहिला ही आशा मावळली आहे. या ठिकाणी पालिकेला सप्त तारांकित मानांकन मिळणे आवश्यक होते. यानंतर शहराचे सौंदर्यीकरण हा निकष महत्त्वाचा ठरणार असून पालिका त्यात अव्वल आहे, मात्र यातही सप्त तारांकित मानांकन मिळण्याची शक्यता कमी आहे. या निकषात इंदौर आजही सप्त तारांकित मानांकनामध्ये असल्याने हे शहर पुन्हा देशात पहिला क्रमांक पटकाविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर सुरत शहरातली वॉटर प्लस या मानांकनात फारशी प्रगती नाही, पण इतर दोन निकषांत हे शहर सर्वोच्च मानांकन प्राप्त करण्याची शक्यता असल्याने गेल्या वर्षीप्रमाणे हे शहर दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धेत आहे.

पालिकेचा प्रयत्न कायम

यंदाचा पहिला क्रमांक हुकला तरी पालिकेने निश्चय केला नंबर पहिला हे ब्रीद कायम ठेवले आहे. पहिला क्रमांक मिळत नाही तोपर्यंत हे ब्रीद कायम राहणार आहे. केव्हातरी पहिला क्रमांक मिळेल या आशेवर प्रशासन काम करीत आहे. २ ऑक्टोबरपासून देशातील सर्व शहरे या योजनेचा शुभारंभ करतात, मात्र नवी मुंबई पालिकेने आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान १५ ऑगस्टपासून सुरू केले आहे. दोन महिने अगोदर ही पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. पहिला क्रमांक हुकला असल्याचे लक्षात येऊनही पालिकेने आपला प्रयत्न कायम ठेवला आहे.

टाळणे शक्य नसल्याने ‘वॉटर पल्स’

स्वच्छ भारत अभियानाच्या या वर्षीच्या स्पर्धेत नवी मुंबई एकमेव शहर टिकून आहे. स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर या प्रकारात शहराने हागणदारी मुक्त मोहीम यशस्वी करताना वॉटर प्लस सर्वोच्च मानांकन पटकाविले आहे. यामागे राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत आहे. नवी मुंबईला टाळणे शक्य नसल्याने किमान वॉटर पल्समध्ये कायम ठेवण्यात आले आहे. केंद्रात भाजपा सरकार असून राज्यात या पक्षाचे सरकार नाही. त्यामुळे राज्यातील एकही शहर या स्पर्धेत यंदा नाही अशी चर्चा आहे. नवी मुंबईला टाळता येत नसल्याने हा वॉटर पल्स मानांकन देण्यात आले आहे, मात्र घनकचरा व्यवस्थापनात हे मानांकन सप्तऐवजी पंच करून नवी मुंबईला मागे टाकण्यात आले आहे.