दोन्ही मात्रा मिळालेले लाभार्थी फक्त २ लाख ७० हजार

नवी मुंबई : लस उपलब्ध होत नसल्याने पालिकेकडून होणारे मोफत लसीकरण संथ गतीने सुरू असले तरी त्याला खासगी रुग्णालयांत होत असलेल्या सशुल्क लसीकरणाची जोड मिळाल्याने आतापर्यंत शहरातील १० लाख २४ हजार ०७७ जणांना पहिली व दुसरी मात्रा देण्यात आली आहे. यात पहिली मात्रा मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही ७ लाख ५३ हजार ७१२ असून आतापर्यंत पात्र लोकसंख्येपैकी ६८ टक्के जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे. तर २ लाख ७० हजार ३६५ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

नवी मुंबईत जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. यात नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सुरुवातीपासून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करीत १०० पेक्षा अधिक केंद्रांवर नियोजन केले. सुरुवातीला मोठय़ा प्रमाणात लस मिळत असल्याने पालिकेचे लसीकरण हे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक होत होते. मात्र शासनाकडून मिळत असलेला लसपुरवठा कमी होऊ लागल्याने लसीकरण विस्कळीत झाले. त्यामुळे दिवसाला १५ हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन करणाऱ्या पालिकेला दिवसाला सरासरी १ हजार जणांचेच लसीकरण करता येत आहे. असे असतानाही पालिका विशेष लसीकरण मोहिमा राबवत जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने मोफत लसीकरणाअंर्तगत आतापर्यंत ५ लाख ४६ हजार ६९० जणांना लस दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पालिकेला मिळालेल्या लसपुरवठय़ातून काही साठा पालिका खासगी रुग्णालयांना देत होती. त्यातून खासगी रुग्णालयांत लसीकरण सुरू होते. मात्र त्यानंतर १ मेपासून खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी मिळाल्यानंतर खासगी रुग्णालयांत सशुल्क लसीकरण सुरू करण्यात आले. त्यात तीन महिने व १७ दिवस या अल्प कालावधीत खासगी रुग्णालयांनी ४,७७,३८७ जणांना सशुल्क लस दिली आहे. ही संख्या पालिकेच्या लसीकरण संख्येपेक्षा कमी असली तरी खासगी रुग्णालयांनी अगदी कमी कालावधीत जास्त लसीकरण केले आहे. नवी मुंबईतील १५ लाख लोकसंख्येपैकी १८ वर्षांवरील जवळजवळ ११ लाख नागरिक लसीकरणास पात्र आहेत.

लसीकरण दोन्ही मात्रा मिळून

११ लाख

पात्र लोकसंख्या

५,४६,६९०

मोफत लसीकरण

४,७७,३८७

सशुल्क लसीकरण आजचे लसीकरण

१५ ऑगस्टनंतर  पालिकेला लसीचा पुरावठा झालेला नाही. त्यामुळे गुरुवारी पालिका रुग्णालयात कॉविशील्ड लशींची दुसरी मात्राच दिली जाणार आहे.