वाढत्या प्रदूषणामुळे उरण परिसरातील मासळीच्या प्रमाणात घट

सुट्टीचे दिवस असल्याने उरणच्या किनारपट्टीवर अनेक पाहुणे येथील मासळीचा आस्वाद घेण्यासाठी आर्वजून येऊ लागले असून, या ऐन सुट्टीच्या काळातच मासळीची आवक घटल्याने मासळीचे दर वाढल्याने खवय्यांचा खिसा रिकामा होऊ लागला आहे. तर आवक घटू लागल्याने मासेमारीवरही परिणाम झाला आहे. येत्या महिनाभरात जून व जुलै या दोन महिन्यांकरिता खोल समुद्रातील मासेमारीला बंदी असणार असल्याने मासेमारीच्या हंगामाचा मे हा शेवटचाच महिना राहिल्याने मच्छीमारांची चिंता वाढू लागली आहे.

किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. तर मासळी हे मुख्य खाद्य असलेलेही याच किनारपट्टीवर वास्तव्य करीत आहेत. मात्र समुद्र तसेच खाडीतील वाढत्या प्रदूषणामुळे मासळीचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यामुळे मासळीची आवकही घटू लागली आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलाचाही परिणाम मासेमारीवर होत असल्याने मासेमारी व्यवसायावर संकट आले असल्याची माहिती करंजा येथील मासेमार विनायक पाटील यांनी दिली. तसेच जी मासळी मिळते तिची विक्री करण्यासाठी मुंबईतील ससुन डॉक हे एकमेव बंदर आहे. या बंदराच्या परिसरात मासेमारी बोटीऐवजी बाहेरील मासळीची विक्री केली जात असल्याने मासेमारी बोटीने मासेमारी करणाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

बोंबीलचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. त्यामुळे बोंबीलचे किलोमागे दर दीडशेवरून १०० वर आले आहेत. परंतु कोळंबी टायनी २५० ते ३००, रिबन फिश १५० रुपये, शिंगाली- २५० पर्यंत, मांदेली- ७५ ते १०० रुपयांपर्यंत गेले आहे. तर महागडी मासळी असलेल्या घोळ- ५०० ते ६००, सुरमई- ५००, पापलेट नगानुसार ३०० ते ५०० रुपयां पर्यंत जाऊन पोहचली आहे.

सर्च लाइटने मासेमारी

माशांच्या दुष्काळावर मात करण्यासाठी मच्छीमारांनी खोल समुद्रात सर्च लाइटने मासेमारीचा पर्याय निवडला आहे. याचे काही तोटे आहेत. रायगड जिल्हा मत्स्य विभागाचे आयुक्त अविनाश कोळी यांच्याशी संपर्क साधला असता, या मासेमारीला राज्य सरकारची परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले.