उरण : करंजा बंदर परिसरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी छापा टाकत दोन एलईडी मासेमारी बोटींवर कारवाई केली.केंद्र व राज्य सरकारने एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यास बंदी घातलेली असतानाही या तंत्राचा वापर करीत खोल समुद्रात मासेमारी केली जात आहे.
एलईडी पद्धतीने मासेमारी करीत असतांना लाखोंच्या संख्येने मासे जाळ्यात पकडले जातात. यात माशांचे लहान जीवही पकडण्यात येतात. मात्र यातील जीव हे मृत पावतात त्यामुळे पुढील मासे आणि प्रजनन थांबून माशांची व काही ठराविक जातीच्या माशांची संख्याही कमी होऊ लागली आहे. याच कारणास्तव शासनाने या पद्धतीने मासेमारी करण्यास बंदी घातली आहे.
एलईडी मासेमारी पद्धत
खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्यावर अतिउच्च दाबाच्या वीज दिव्यांचे सेट घेऊन जात आहेत. हे दिवे समुद्रात सोडण्यात येतात. त्यामुळे या प्रकाशावर आकर्षित होऊन लाखोंच्या संख्येने विविध प्रकारचे मासे जाळ्यात येतात. या प्रकारामुळे जलद व मुबलक मासेमारी करून कमी वेळात जास्तीत जास्त नफा कमावला जात आहे.
करंजा बंदर परिसरात एलईडी मासेमारी करणारे साहित्य असणाऱ्या करंजा आणि पेण तालुक्यातील दादर येथे प्रत्येकी एक अशा दोन बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा मत्स्यव्यवसाय उपायुक्त यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. यामध्ये बोटींना साडे पाच लाख रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. सुरेश बागुलगावे, परवाना अधिकारी, उरण मत्स्यव्यवसाय विभाग