प्रजनन कालावधी लांबल्याने उशीर

उरण तालुक्यातील पाणजे,डोंगरी तसेच दास्तानफाटा आदी ठिकाणच्या पानथळ्यावंर दरवर्षी ऑक्टोंबर महिन्या पासूनच हजारो मैलांचा प्रवास करीत परदेशातील रोहीत(फ्लेमिंगो)पक्षी येतात. यावर्षी जानेवारी महिना उजाडला असतांनाही पक्षांचे आगमन झालेले नाही. त्यामुळे यावर्षी या पक्षांचे आगमन लांबणीवर पडले असल्याची माहीती पक्षी प्रेमींनी दिली. हे आगमन लांबल्याचे एक कारण म्हणजे गेल्या वर्षी जून ते जुलै पर्यंत फ्लेमिंगोचे वास्तव्य होते. त्यामुळे त्यांच्या प्रजननच्या कालावधीत वाढ झाल्याने हे आगमन लांबल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.

दरवर्षी उरणच्या पानथळ्यांवर हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो येतात. त्यामुळे येथील खाडी किनारे बहरून गेलेले असतात. हे पक्षी न्याहळत त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पक्षी प्रेमी येऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे सिने सुष्टीतील कलावंतानाही या पक्षांनी भूरळ घातली आहे. येथील अरबी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पाणजे खाडी तसेच डोंगरी येथील मिठागरांच्या पानळ्यावर तसेच उरण पनवेल मार्गावरील दास्तान येथील खाडी किनाऱ्यावर या पक्षांची मुख्य स्थाने आहेत. सैबेरीया प्रांतात उष्णात वाढू लागल्या नंतर भारतातील थंड वातावरणाच्या शोधात दरवर्षी हजारो फ्लेमिंगो येत आहेत. त्यामुळे उरण मधील अनेक तरूणही पक्ष प्रेमी बनले आहेत. त्यांनी आपला छंद जपण्यासाठी महागडे कॅमेरेही खरेदी केलेले आहेत. तर इतर शहरातून येणाऱ्या पक्षी अभ्यासकांना ते मदत करीत आहेत. अशा प्रकारचे हजारोंच्या संख्येने येणारे पक्षी पाहून स्थानिकांनाही आनंद होत आहे. पक्षांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाकडून गस्तही घालण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना या रोहीत पक्षांच्या आगमनाची आस लागून राहीलेली आहे.

अविनाश भगत,पक्षी अभ्यास – सध्या गुजरातच्या कच्छ परिसरातून फ्लेमिंगो मुंबई परिसरात येऊ लागले आहेत. मागील वर्षी हे पक्षी उशिरा गेल्याने त्यांच्या प्रजननाच्या कालावधीत वाढ झाली आहे. तसेच वातावरणातील बदलामुळेही त्यांची मातीतील घरटी करण्यासही विलंब लागल्याने त्यांच्या आगमनाला यावर्षी उशिर झाला आहे. मात्र येत्या आठवडय़ाभरात उरण परिसरातील पानथळ्यावरही या पक्षांचे आगमन होईल अशी माहीती त्यांनी यावेळी दिली.