उरण : सागरी अटलसेतूवर गस्त घालणाऱ्या पोलिसांना थांबण्यासाठी निवारा शेड आणि गस्तीला वाहन देण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली होती. त्यानुसार पथकर नाक्यावर पोलिसांसाठी एका कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गस्ती वाहन न मिळाल्याने त्याची प्रतीक्षा आहे. तर वाहतूक पोलिसांनी केलेल्या मागणीनुसार एका कंटेनरची सोय केली असल्याची माहिती न्हावा शेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी नवी मुंबई आणि उरणला जोडणाऱ्या सागरी अटलसेतूचे उदघाटन करण्यात आले होते.या उद्घाटनाला सहा महिने उलटले आहेत. शिवडी-न्हावा शेवा सागरी अटलसेतूपैकी १०.४ ते १९.६ किलोमीटरचा मार्ग न्हावा शेवा वाहतूक पोलीस हद्दीत येत असून त्यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी आहे.गव्हाण, शेलघर टोलनाका / शिवाजीनगर टोल यांचाही समावेश आहे. या पुलाच्या सुरक्षेची जबाबदारी ही न्हावा शेवा वाहतूक विभागचीही आहे.

हेही वाचा >>>द. आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची उल्लेखनीय लक्षणीय कामगिरी

पुलावर गस्त घालत असताना उरणहून थेट मुंबईपर्यंत जावे लागत आहे. त्यामुळे या पुलावर सुरक्षा ठेवण्यासाठी उरण व मुंबई या दोन्ही भागांतून लक्ष देण्यासाठी किमान दोन वाहनांची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांना ऊन आणि पावसाळ्यात बचाव करता यावा याकरिता निवारा शेडची आवश्यकता आहे. यात उन्हाळ्याचे चार महिने सरले असून पावसाला सुरुवात झाली आहे.