नवी मुंबई : ऐरोली येथील माजी नगरसेवक एम के मडवी यांनी काही जणांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले होते. रबाळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. भर रस्त्यात एम के मडवी पोलिसांशी वाद घालत आहेत असे व्हायरल झालेल्या चित्रफीत मध्ये दिसून येत आहे.

ऐरोली मधील माजी नगरसेवक एम के मढवी यांनी निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना उ बा ठा पक्षाला जय महाराष्ट्र करीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. गुन्हेगारी आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले म्हणू त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. मात्र त्यांचा प्रभागात प्रभाव असल्याने तीन वेळा निवडून आले. मात्र बहुतांश वेळी निवडणूक काळात गुन्हेगारी कृत्याने ते प्रकाश झोतात येतात.

यावेळीही अशीच घटना घडली असून मतदानाच्या पूर्वसंध्येला , माजी नगरसेविका विनया मढवी, आणि करण मढवी यांनी ऐरोली सेक्टर १६ येथील एका मंडळाच्या ठिकाणी जाऊन त्या मंडळातील युवकांना मारहाण केली असा आरोप होत आहे. मारहाण करतानाचा सिसिटीव्ही व्हिडीओ देखील व्हायराल झाला आहे. ऐरोलीतील एका मंडळाच्या मुलांना शिवीगाळ व धमकी देऊन त्यांना मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यावेळी मुलांनी तक्रार केली असता रबाळे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व अधिकारी घटने संदर्भात विचारपूस करण्याकरिता गेले असता पोलिसांसोबत मढवी कुटुंबियांनी हुज्जत घातल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेत मडवी यांना रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांना विचारणा केली असता त्यांनी मडवी याला अद्याप अटक केले नाही अशी माहिती दिली आहे.

मडवी यांच्या विरोधात या पूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकेकाळी वनमंत्री गणेश नाईक यांचा कट्टर समर्थक असणारे मडवी आता नाईक यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबात ते स्वतः त्यांची पत्नी विनया आणि मुलगा करण हे तिघेही नगर सेवक होते. शिवसेना उबाठा गटात असतानाही ते ठाकरे यांचे निकट वर्तीय म्हटले जात होते. मात्र या निवडणूकीच्या काही दिवस अगोदर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.