घणसोली गावात चार मजली इमारत जमीनदोस्त

घणसोली  गावात अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई करीत चार मजल्यांची एक अनधिकृत इमारत जमीनदोस्त केली.

मोठय़ा पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर कारवाई

नवी मुंबई : घणसोली  गावात अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई करीत चार मजल्यांची एक अनधिकृत इमारत जमीनदोस्त केली. संबंधित व्यक्तीला याबाबत नोटीस देण्यात आली होती, मात्र त्यांनी नोटीसला उत्तर न दिल्याने सदर कारवाई करण्यात आली. घणसोली गावात मरीआई माता मंदिर, दत्तनगर परिसरात एका ठिकाणी चार मजल्यांची इमारत अनधिकृतपणे  उभारण्यात आली होती. ही इमारत अनधिकृत असून बांधकाम पाडून टाकण्यासंबंधात नोटीस देण्यात आली होती. तरीही इमारतीचे बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घणसोली विभाग अधिकारी महेंद्रसिंह ठोके आणि अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने  कारवाई करीत इमारत पाडून टाकली. 

पाडण्यात आलेली इमारत सुनील सातपुते यांची होती, तर दिलीप सोळंकी हा विकासक होता.  या भागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधाकामे सुरू असून मनपा अशा सर्व कामांवर कारवाई करणार असल्याचे ठोके यांनी स्पष्ट केले. या कारवाईवेळी अधिकारी-कर्मचारी तसेच २० पेक्षा जास्त कामगार उपस्थित होते. यावेळी जेसीबी व पोकलेन मशीनचाही वापर करण्यात आला. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली, अशी  माहिती विभाग अधिकारी ठोके यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four storey building demolished ghansoli village ysh

Next Story
भारत पेट्रोलियम प्रकल्पाशेजारील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी