scorecardresearch

विमानतळ नामकरणाबाबत गडकरी यांचे मौन

पनवेल येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जेएनपीटीच्या महामार्ग लोकार्पण सोहळय़ात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उरणचे आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली. मात्र, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्याबाबत मौन बाळगणेच पसंत केले.

पनवेल : पनवेल येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जेएनपीटीच्या महामार्ग लोकार्पण सोहळय़ात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उरणचे आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली. मात्र, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्याबाबत मौन बाळगणेच पसंत केले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांच्या भाषणाच्या मोकळय़ा शैलीमध्ये गेल्या १२ वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करू न शकल्याबद्दल दु:ख व्यक्त करत येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाची बांधणी करताना कळंबोली जंक्शनवरील वाहतुकीच्या ताणामुळे या जंक्शनसाठी वेगळी सोय करण्याची मागणी होती. मात्र त्यावेळी राज्याची आर्थिक स्थिती आतासारखीच असल्याने त्यावेळी झालेल्या नियोजनातील चूक केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्वीकारत याच चुकीच्या दुरुस्तीसाठी सुमारे ८०० कोटी रुपयांचा बांधकाम खर्च असलेले विविध एकावर एक असे चार उन्नत मार्ग येथे बांधत असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागाराची नेमणूक केल्याची माहिती यावेळी उपस्थित पनवेलकरांना दिली.
रायगड जिल्ह्यात गेल्या ७ वर्षांत १० हजार कोटी रुपयांची १८ विविध रस्त्यांची कामे हाती घेतली असून त्यापैकी ५ कामे पूर्ण झाली. १३ कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. तसेच गेल्या सात वर्षांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्ह्यात ३२५ टक्क्यांनी अधिकचे रस्ते बांधल्याचे यावेळी उपस्थितांना सांगितले. तसेच महामार्गाची बांधकामे मोठी झाली असली तरी या महामार्गाशेजारी वृक्षारोपण झाले नसल्याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.
‘किल्ल्यांचा विकास महत्त्वाचा’
याच सोहळय़ात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री व पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांना राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या विकासकामांचे प्रकल्प केंद्राकडे दिल्यास त्या कामांना मंजुरी करून देईन असे जाहीर आश्वासन गडकरी यांनी राज्यमंत्र्यांना दिले. किल्ले हे मातीचे नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा व राज्याचा हा इतिहास भविष्यातील पिढीपर्यंत पोहचण्यासाठी किल्ल्यांचा विकास महत्त्वाचा असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gadkari silence airport naming national highways authority jnpt highways union minister mumbai airport amy

ताज्या बातम्या