राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेरुळमधील नगरसेविका शशिकला मालादी यांच्या आत्महत्येची सीआयडी चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री गणेश नाईक यांनी रविवारी केल्याने या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. मालादी गेले चार महिने मानसिक दडपणाखाली असल्याची बाब पुढे आली असून त्यांनी आत्महत्या करण्याइतपत निर्माण झालेल्या परिस्थितीचा पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणात काँग्रेस व राष्ट्रवादीतील दोन नगरसेवकांनी मालादी यांचा मानसिक छळ केल्याची बाबदेखील पुढे आली आहे.
ऐन गणेशोत्सवात मालादी घरातून गायब झाल्या होत्या. तब्बल पाच दिवसांनी याबाबत पोलीस तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यापूर्वी काही दिवस आधी त्यांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबत भांडण झाले होते, अशी बाब पुढे आली आहे. या भांडणाच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. मालादी ह्य़ा काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी व जाधव मास्तर यांच्या कार्यकर्त्यां होत्या. त्यानंतर या पालिका निवडणुकीत हा प्रभाग राखीव झाल्याने त्यांनी माजी नगरसेवक सुरेश शेट्टी यांच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यात त्या विजयी झाल्या. तेव्हापासून त्या मानसिक दबावाखाली दिवस काढत असल्याचे उघड होत आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस काही माजी नगरसेवकांचीही चौकशी करणार आहेत.
मालादी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घराचा गाडा हाकलेला असल्याने त्या आत्महत्या करतील यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास नाही. गणेश नाईक यांनी रविवारी झालेल्या शोकसभेत या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे जाहीर केले आहे.
बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आयुक्त प्रभात रंजन यांच्याकडे केली आहे. मात्र पोलिसांचा तपास धिम्यागतीने सुरू आहे. यापूर्वी नगरसेवक पप्पू सावंत, अनंता भोईर व आनंद काळे यांच्या हत्यांचा तपास नवी मुंबई पोलिसांनी गुंडाळला आहे.