नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता येऊनही मोठ्या विजयाचे स्वप्न भंगल्याने वनमंत्री गणेश नाईक यांनी पराभूत विभागांमध्ये पुन्हा एकदा जुन्या चेहऱ्यांना संधी देत भविष्यातील जुळवाजुळव सुरू केल्याचे दिसत आहे. ऐरोलीतून अपर्णा गवते, तळवली भागातून लक्ष्मीकांत पाटील, तुर्भ्यातून अमित मेढकर, वाशीतून भरत नखाते या जुन्याच चेहऱ्यांना ‘स्वीकृत’ची संधी देत ढासळलेल्या बालेकिल्ल्यांचे बुरुज पुन्हा बांधण्यासाठी नाईकांनी कंबर कसली आहे.

विशेष म्हणजे, स्वीकृत नगरसेवक आणि परिवहन समिती सदस्यपदाच्या निवडीवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या एकाही समर्थकाची निवड होणार नाही याची पुरेपूर काळजी नाईकांनी घेतल्याचे दिसते.नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ६५ जागा मिळवून भाजपला एकहाती सत्ता मिळाली असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेल्या ४२ जागा या नाईकांना अस्वस्थ करणाऱ्या ठरल्या आहेत. मध्यंतरी वाशीतील एका कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी या निवडणुकीत भाजपला ९० जागा मिळायला हव्या होत्या असे सांगितले.

आमचे २५ उमेदवार अनपेक्षितपणे पराभूत झाले असे शल्यही त्यांनी व्यक्त केले. शिंदे यांच्या शिवसेनेला ऐरोली विधानसभा क्षेत्राने सावरल्याचे पहायला मिळाले. ऐरोलीतील २० जागांपैकी १६ जागांवर शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक विजयी झाले. पाच क्रमांकाच्या पॅनलमध्ये भाजपचे तीन उमेदवार निवडून आले खरे, मात्र तेथेही उमेदवार निवडीत शिंदे यांच्या पक्षाकडून झालेल्या गफलतींचा फटका त्या पक्षाला बसला. दरम्यान स्वीकृत नगरसेवकपदासाठी निवड करत असताना गणेश नाईक यांनी ऐरोलीतील ठरावीक प्रभागांवर लक्ष केंद्रीत केल्याचे चित्र पहायला मिळाले.

चौगुले, कुलकर्णी, पाटकर लक्ष्य?

दिघा, चिंचपाडा परिसरात यंदाच्या निवडणुकीत शिवसेना नेते विजय चौगुले यांनी मोठा विजय मिळवला. या भागातील आठ जागांपैकी तीन जागांवर चौगुले यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी विजय मिळवला. ऐरोलीतील दुसऱ्या एका प्रभागातून चौगुले यांचे पुत्र ममित विजयी झाले. ऐरोलीत चौगुले यांचे हे वाढते प्रस्थ लक्षात घेऊन नाईक यांनी दिघा परिसरातील अपर्णा गवते, दिवा गावातील बंडू केणी यांना संधी दिली आहे.

तुर्भ्यात अमित मेढकर यांना संधी देत या भागातील शिंदेसेनेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांना आव्हान कायम रहावे असा प्रयत्न नाईकांनी केलेला दिसतो. तळवलीत पराभूत माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांना संधी देत तेथे रमाकांत म्हात्रे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न नाईकांनी केला आहे. वाशीतील जुने निष्ठावंत भरत नखाते यांना पुन्हा महापालिकेत पाठविण्याचा निर्णय घेताना वाशीतील शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांना प्रतिस्पर्धी असावा अशी आखणी करण्यात आली आहे.

नेरूळमधून पंजाबी समाजातील सक्रिय कार्यकर्ते कुलदीप सूरी या नव्या चेहऱ्याला नाईकांनी संधी दिली आहे. परिवहन सदस्य पदासाठी भाजपने १२ उमेदवार रिंगणात उतरविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या या खेळीमुळे सावध झालेल्या शिंदेसेनेनेही ऐनवेळी परिवहन सदस्य पदाच्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.