कार्यकर्ता शिबिरात विरोधकांवर टीका
विरोधकांचे आरोप, प्रत्यारोप, टीका-टिप्पणी यांच्यावर सहसा प्रतिक्रिया न देणारे राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी रविवारी झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विरोधकांचे नाव न घेता पलटवार केला. लोकशाहीच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्यांना वठणीवर आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत असून याच कार्यकर्त्यांच्या त्याग व ताकदीवर पुढील लोकसभा, विधानसभा आणि पालिकेत स्पष्ट बहुमत आणण्याचा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला.
शहरात युती शासनाने मंजूर केलेला वाढीव चटई निर्देशांक सदोष असल्याचेही त्यांनी सांगितले.
एफएसआय उशिरा मंजूर झाल्याची खंत व्यक्त करताना आपणही त्याबाबत दोषी असल्याची कबुली त्यांनी दिली. दिघा येथील बेकायदा बांधकामांचा निकष सर्वाना लावल्यास राज्यात लाखो बांधकामे पाडण्याची वेळ येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाशी येथील भावे नाटय़गृहात कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागल्याने नाईकांच्या साम्राज्याला हादरा बसला होता. पालिका निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमत न देता अपक्ष व काँग्रेसचा आधार घेण्यास राष्ट्रवादीला भाग पाडले.
या पाश्र्वभूमीवर हा मेळावा झाला. कल्याण-डोंबिवलीत पक्ष निर्णायक भूमिका बजावेल असा दावा त्यांनी केला.