नवी मुंबई : ‘या लोकांनी बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेला,’ असा घणाघात वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी केला. ‘नवी मुंबईत क्लस्टर पुनर्विकास लागू करून बिल्डरांच्या घशात पैसे घालण्याचा प्रयत्न झाला तर त्यांच्या घशातून पैसे काढेन,’ असा इशाराही त्यांनी दिला. सानपाडा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना नाईक यांनी क्लस्टरच्या मुद्द्यावरून सरकारच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला. १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या महासभेसाठी भाजपच्या सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येणार असून, यासाठी पक्षाकडून व्हीप बजावण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘जनतेला गृहीत धरून कोणी नाटक करेल तर त्या नाटकाचा तमाशा काय आहे, हे लोकांना दाखवेन. आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार असेल तर त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवण्याची ताकद आमच्यात आहे,’ अशा शब्दांत नाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत, कोणत्याही व्यक्तीशी आपला वैयक्तिक वाद नसल्याचे सांगतानाच जनतेला गृहीत धरून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करू, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

नाईक आणि शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष जुना असून, नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात त्याची धार अधिक तीव्र झाली होती. आता नगरविकास खात्याकडून नवी मुंबईत क्लस्टर पुनर्विकासाला चालना दिली जात असताना नाईक यांनी या धोरणाला विरोध केल्याने दोन्ही नेत्यांमधील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईतील नियोजनबद्ध कॉलनी परिसरात क्लस्टर पुनर्विकास लागू करण्यास नाईक यांचा तीव्र विरोध आहे. दाटीवाटीच्या वसाहती, गावठाण किंवा झोपडपट्टीसदृश भागांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योग्य ठरू शकतो. मात्र, २० वर्षे जुन्या इमारती असलेल्या नियोजनबद्ध कॉलनी परिसराला क्लस्टरच्या कक्षेत आणणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा ठिकाणी स्वतंत्र पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे.

‘चार एफएसआयमध्ये काम भागत असताना अतिरिक्त एफएसआयच्या माध्यमातून बिल्डरांच्या खिशात पैसे घालण्याची रचना केली जात असेल तर ती चालू देणार नाही,’ असे नाईक यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्यांच्या जमिनी आणि हक्कांच्या किंमतीवर बिल्डरांचा फायदा करून देणारे निर्णय सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर १० ऑगस्टच्या नवी मुंबई महापालिकेच्या महासभेला भाजपच्या सर्व नगरसेवकांनी पूर्णवेळ उपस्थित राहावे, यासाठी व्हीप बजावण्यात येणार आहे. सभागृह नेते सागर नाईक हे या मुद्द्यावर प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले असून, क्लस्टर धोरणातील बदलांविरोधात महासभेत विशेष ठराव मंजूर करून तो नगरविकास खात्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

युनिफाइड विकास नियंत्रण नियमावलीतील क्लस्टरविषयक तरतुदींवर नाईक यांनी यापूर्वीही आक्षेप घेतला आहे. वाढीव एफएसआयमुळे नवी मुंबईतील वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पार्किंग आणि अन्य नागरी सुविधांवर ताण येईल, असा त्यांचा दावा आहे. महासभेच्या ठरावावर महिनाभरात समाधानकारक निर्णय न झाल्यास न्यायालयात जाण्याची भूमिका त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे १० ऑगस्टची महासभा ही क्लस्टरच्या मुद्द्यावरून नाईक विरुद्ध नगरविकास खाते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाची पुढील दिशा ठरवणार असून, राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे लागले आहे.