Ganesh Naiks response to Sushma Andharens allegations mentioning Balasaheb Thackeray msr 87 | Loksatta

“आमचे धंदे बंद करायाला कुणाचे आदेश…”; सुषमा अंधारेंच्या आरोपांवर गणेश नाईकांचं बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रत्युत्तर

जाणून घ्या काय म्हणाले आहेत आणि नेमकं काय आहे प्रकरण?

“आमचे धंदे बंद करायाला कुणाचे आदेश…”; सुषमा अंधारेंच्या आरोपांवर गणेश नाईकांचं बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रत्युत्तर

शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा काल नवी मुंबईत होती. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाषण करताना विरोधकांवर टीका केली. तसेच नवी मुंबईतील मातब्बर नेते गणेश नाईक यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. नवीमुंबईतील अनधिकृतपणे खाणकाम, डोंगर पोखरण्यावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी गणेश नाईकांना झापलं होतं आणि हे सर्व धंदे बंद करण्यास सांगितलं होतं. असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या. यावर आता गणेश नाईक यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना गणेश नाईक म्हणाले “सिडकोच्या निर्माण होण्यासाठी दगडाची गरज होती. त्यावेळी पावण्यापासूनचा डोंगर सिडकोने वृक्षतोड करून घेतला. त्यावेळी मी आमदार नव्हतो, समाजसेवक होतो. परंतु तेव्हा मी इथल्या प्रकल्पग्रस्त लोकांना त्या दगडाच्या खाणी मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि प्रकल्पग्रस्तांना त्या खाणी मिळवून दिल्या. एक गोष्ट खरी आहे जे उत्खनन झालं ते अतिशय विद्रुप पद्धतीने झालं. बाळासाहेब ठाकरेंच्या लक्षात ती गोष्ट आल्यानंतर त्यांनी क्वाऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल माझा काही आक्षेप नव्हता. आमच्या नाईक कुटुंबाच्या क्वाऱ्या होत्या परंतु दोनशे-अडीचशे क्वाऱ्यांमध्ये नाईक कुटंबाच्या दोन-तीन क्वाऱ्या होत्या, म्हणून त्या सगळ्या नाईकांच्याच क्वाऱ्या होत्या. अशा प्रकारचा गैरसमज पसरवला जातोय, माहिती पूर्ण घ्यावी. यानंतर संजीव नाईक जेव्हा खासदार झाले तेव्हा त्या क्वाऱ्या पुन्हा सुरू झाल्या होत्या, हे माहीत आहे की नाही? त्यानंतर माझा स्वीय सहायक पांडुरंग माळीच्या बंधूने एनजीटीमध्ये जाऊन या क्वाऱ्या बंद केल्या. त्यापूर्वी त्या बावकरेश्वर मंदिराच्या परिसरात धुळीचे कण येतात म्हणून आमच्या नाईक कुटुंबाने सुमोटो अगोदरच बंद केल्या होत्या. त्यानंतर एनजीटीने त्या क्वाऱ्या बंद केल्या. आमचे धंदे बंद करायाला कोणाचे आदेश नाही कारणीभूत ठरले.”

याशिवााय “मी दहा वर्ष पर्यावरणमंत्री होतो. पर्यावरणाचं महत्त्व मला समजतं. पर्यावरणाचं महत्त्व समजतं म्हणून नवी मुंबईत एसटीपीचे प्लॅन्ट तयार केले, ते ३० हजार वस्तींना पुरतील एवढे केलेले आहेत. आज नवी मुंबईची वस्ती १५ लाखांची आहे. मी आत्मविश्वासाने सांगतो की मुंबईचा एसटीपी ५० टक्के समुद्रात सोडला जातो. मग पर्यावरणाची कोणाला पडलेली आहे.” असंही गणेश नाईकांनी यावेळी सांगितलं.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या? –

“नवी मुंबईत एकेकाळी एक मोठे नेते होऊन गेले, ते गणेश नाईक. बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा समजले की इथे अनधिकृतपणे खाणकाम सुरू आहे, कोणी डोंगर कोरतंय, कोणी दगडं कोरतंय. तेव्हा त्यांना कुणीतरी सांगितलं की आपलाच माणूस आहे. गणेश नाईकांना वाटलं आपलाच माणूस आहे म्हटल्यावर बाळासाहेब त्यांना सोडून देतील. पण तस झालं नाही. बाळासाहेबांनी त्यांना बोलावलं आणि सुनावलं. पर्यावरणाचा ऱ्हास केलेला मला चालणार नाही, निसर्गाची हेळसांड झालेली मला चालणार नाही. आताच्या आता हे सर्व बंद करा, असं बाळासाहेबांनी सांगितलं. त्यानंतर गणेश नाईकांनी काढता पाय घेतला आणि शिवसेनेपासून लांब झाले.” असं शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाषणात सांगितले होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-10-2022 at 22:12 IST
Next Story
शीव-पनवेल महामार्गावरील पथदिवे बंद; केबल खराब झाल्याने अंधार