नवी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दोन हात करत नवी मुंबई महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात निर्णायक भूमीका बजाविणारे वन मंत्री गणेश नाईक यांनी शहराच्या महापौर निवडीत सर्वांचे अंदाज चुकवत धक्कातंत्राचा प्रयोग अंमलात आणल्याचे पहायला मिळाले. महापौर पदाच्या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या नावांना मागे सारत नाईकांनी नेरुळ लगत असलेल्या सारसोळे गावातील कडवे समर्थक सुरज पाटील यांच्या पत्नी नगरसेविका सुजाता पाटील यांची या पदावर वर्णी लावली आहे. अभ्यासू आणि आक्रमक अशी प्रतिमा असणारे सूरज हे नाईक कुटुंबियांचे निष्ठावान मानले जातात. तसेच भाजपचा नवी मुंबईतील तरुण आघाडीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. त्यांच्या पत्नीची या पदावर निवड करत नाईकांनी ग्रामीण आणि शहरी असा समतोलही साधला आहे.

नवी मुंबई महापालिकेची यंदाची निवडणुक चुरशीची झाली. वन मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षामुळे ही निवडणुक संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. नाईक यांनी अतिशय आक्रमक प्रचार करत भाजपला शहरात एकहाती सत्ता मिळवून दिली. १११ जागा असलेल्या नवी मुंबई महापालिकेत भाजपचे ६५ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ४२ नगरसेवक निवडून आले. बहुमतासाठी आवश्यक असलेला ५६ चा आकडा भाजपने सहज ओलांडला आहे. विशेष म्हणजे निवडून आलेले ६५ पैकी बहुसंख्य नगरसेवक हे नाईक यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

 त्यामुळे नवी मुंबई महापालिकेवर नाईक यांची पकड आणखी मजबूत झाली आहे. भाजप आणि गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिकेवर सत्ता आल्याने शहराचे महापौर पद कुणाकडे जाईल याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. यंदाचे महापौर पद महिलांसाठी राखीव असल्याने नाईक यांचे पुतणे सागर नाईक हे या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले होते. सागर नाईक यांची महापालिकेच्या कामकाजावर उत्तम पकड आहे. त्यामुळे त्यांची या पदासाठी निवड अपेक्षीत मानली जात होती. मात्र आरक्षणाचा फटका सागर यांना बसला.

सुरज पाटील यांना न्याय मिळाला

दरम्यान या पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका नेत्रा शिर्के, माधुरी सुतार, रेखा म्हात्रे अशी काही नावे चर्चेत होती. नेत्रा शिर्के यांनी यापुर्वी स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषविले आहे, तर माधूरी सुतार या भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष राहील्या आहेत. याशिवाय तुर्भे येथील नगरसेविका शुभांगी पाटील यांचेही नाव या पदासाठी चर्चेत होते. असे असताना नाईकांनी सारसोळे गावचे नगरसेवक सुरज पाटील यांच्या पत्नी सुजाता यांची या पदावर निवड करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सुरज पाटील हे गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

 २०१० मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले सुरज हे तरुण आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. यंदा प्रभागाच्या रचनेत त्यांचा प्रभाग गाव आणि शहरी भागात विभागला गेला होता. असे असतानाही दोन्ही विभागातून मोठे मताधिक्य मिळवत सुरज आणि सुजाता हे दांम्पत्य निवडून आले होते. सुजाता पाटील या २०१५ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. यावेळी हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला होता. या निवडणुकीनंतर सुरज पाटील यांची स्विकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली होती. दरम्यान सलग दोन वेळा निवडून आलेल्या सुजाता पाटील यांची महापौर पदाच्या उमेदवारीसाठी निवड करत नाईकांनी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.