लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : मोरबे धरण हे नवी मुंबई शहराचा व नवी मुंबईकरांचा सन्मान आहे. परंतु आगामी काळात ४० लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करता येण्यासाठी भिरा प्रकल्पाचे पाणी आणण्याचे नियोजन करून सर्व नागरिकांना समप्रमाणात पाणीपुरवठा मिळालाच पाहिजे, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांना केली. मोरबे धरण १०० टक्के भरल्यामुळे गुरुवारी धरणावर जलपूजनाचे आयोजन केले होते. त्यावेळी नाईक यांनी भविष्यातील पाणी नियोजनाची मागणी केली. आता मोरबे धरणात २९ जुलै २०२५ पर्यंत म्हणजेच ३३५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महापालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृध्द महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेले ४५० द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण भरले. त्यानिमित्ताने गणेश नाईक , महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मोरबे धरण प्रकल्पस्थळी पारंपरिक पद्धतीने जलपूजन करण्यात आले. यावेळी माजी महापौर जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, विनोद म्हात्रे यांसह अनेक विभागांचे अतिरिक्त आयुक्त, अधिकारी उपस्थित होते.
आणखी वाचा-नवी मुंबई : दोन दलालांच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक
मोरबे धरण परिसरात आतापर्यंत या पावसाळ्यात ३३७४ मिमी पावसाची नोंद झालेली असून पाण्याची पातळी पूर्ण ८८ मीटर इतकी भरलेली आहे. धरणात १९१.४६३ दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा असून त्यामधील पाण्याचा गुरुवारी जलपूजनाच्यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलविसर्ग करण्यात आला. प्रत्येक वर्षी मोरबे धरणातील जलसाठा पूर्ण भरावा अशी मनोकामना करीत जलपूजन कार्यक्रम झाला.
मोरबे धरण यंदा ऑगस्टमध्ये पूर्ण भरले असून ही नवी मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट असून ही निसर्गाची कृपा आहे. नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. सर्वच विभागांत समान पाणीवाटप करण्याबाबत उपायोयजना करण्यात येतील. -डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नमुंमपा