उरणमधील गणेशोत्सव मंडळांकडून सामाजिक बांधिलकी जपत राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आखून दिलेल्या नियमांनुसार मंडप उभारणीचे र्निबध येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घातले असून र्निबध मोडणाऱ्या मंडळांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी सक्त ताकीद उरण पोलसांकडून देण्यात आली आहे. उरणमध्ये तीन ते चार मंडळेच मुख्य रस्त्यात असल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे.
यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर राज्यातील दुष्काळाचे सावट पाहता तीस वर्षे पूर्ण करणाऱ्या नगरसेवक महेश बालदी यांच्या मंडळाने उत्सवातील कार्यक्रम कमी करून एक लाखाची भरघोस मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती चौकातील शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बळीराजाच्या व्यथा दर्शविणारे चलचित्र साकारले आहे. तर सिद्धिविनायक मंडळ सातरहाटी यांनी अहिरावन या श्रीराम-लक्ष्मण, हनुमान व रावणाच्या युद्धाचे चलचित्र आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी स्वामी विवेकानंद चौकातील गणेश मंडळ गणेशोत्सवाच्या कालावधीत नैसर्गिक फुलांचीच सजावट करणार आहे. कोटनाका बुरूड आळीमध्ये राजे शिवाजी मित्रमंडळाकडूनही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले जात आहेत.तर जय शिवराय मंडळ कामठा, देऊळवाडी युवक मंडळ, वायू विद्युत केंद्र तसेच ओएनजीसी कामगार वसाहत येथील मंडळाकडूनही देखावे तयार केले जात असून यापैकी बहुतांशी मंडळांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमावरील खर्चात कपात करून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.