पनवेल तालुक्यातील पारंपरिक गणेशोत्सवाला लोकोत्सवाचा दर्जा मिळावा यासाठी पथनाटय़, चलचित्रांतून आणि सजावटीमधून पालक-विद्यार्थी यामधला तुटलेला संवाद, विद्यार्थ्यांचा झालेला नेटिझन्स, शिक्षण व्यवस्थेमधील लागलेली स्पर्धा, धार्मिक एकोपा अशा विविध नाजूक विषयांना हात घातला आहे. विशेष म्हणजे एका मंडळाने लोकमान्य टिळकांनी ही परंपरा सुरू करण्याच्या कल्पनेला आजचा नागरिक कसा प्रतिसाद देतोय का याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
कळंबोलीत पथनाटय़
कळंबोली – येथील बिमा कॉम्प्लेक्स व्यापारी संकुलाच्या गणेशोत्सव मंडळाने १४ मिनिटांचे पथनाटय़ आयोजित केले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन विद्यालयाची मुले हे पथनाटय़ सादर करणार आहेत. उद्धव कदम गुरुजींच्या लेखन, मार्गदर्शन आणि मंडळाचे सचिव चंदू बागलांसारख्या थोरांच्या कल्पकतेमधून सादर होणारे नाटय़ सामाजिक प्रबोधनासोबत व्हॉट्सअ‍ॅपचे सध्याच्या पिढीवरील दुष्परिणाम, पालकांचा विद्यार्थ्यांवरील ताण, त्यामुळे मुलांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी यावर भाष्य करणार आहे.
त्याचप्रमाणे कळंबोली येथील एलआयजी या बैठय़ा चाळींच्या राजे शिवाजीनगर रहिवासी मंडळाने २८ वर्षांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला आहे. उद्धव कदम सरांच्या लेखन व नेपथ्यकार सूर्यकांत म्हसकर यांच्या संकल्पनेतून शिवाजी महाराजांच्या पुरंदरच्या तहाचे १५ मिनिटांचे पथनाटय़ येथे होणार आहे.

इको-फ्रेंडली गणेश आणि ‘मोगली’चे प्रबोधन
टपालनाका – ५४ वर्षांची परंपरा जपणाऱ्या पनवेल गावातील टपालनाका येथील शनी मंदिरामध्ये गणेशोत्सव साजरा करणाऱ्या श्री गणेश मित्र मंडळाने इको-फ्रेंडली मूर्तीची स्थापना करण्याची आपली परंपरा गेल्या सहा वर्षांपासून अबाधित ठेवली आहे. रद्दी पेपरपासून पेपरमॅक्सचा गणेश या शनी मंदिरात अवतरणार आहे. मूर्तीची उंची सात फूट आणि वजन अवघे नऊ किलो आहे. जासई गावातील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे मोरेश्वर पवार यांनी ही मूर्ती तयार केली आहे. सजावटीमध्ये जंगलबुक या टीव्ही मालिकेतील मोगली या प्रसिद्ध पात्राला आमंत्रण दिले आहे. भक्तांना आठ मिनिटांचा मोगली येथे पाहायला मिळणार आहे. जंगलातील मोगली एवढय़ा वर्षांनंतर शहरात आल्यावर त्याला पृथ्वीचे बदलतेपण दिसणार आहे. लहान मुलांकडील मोबाइल फोन, मुलांच्या पाठीवरील पुस्तकांचे वाढलेले ओझे आणि मुले इंटरनेटमध्ये मग्न होऊन मैदानी खेळ विसरलेत याकडे मोगली लक्ष वेधणार आहे. हा मोगली जास्त फास्टफूड खाणाऱ्या मुलांनाही प्रबोधन करणार आहे. संकल्पना, लेखन नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी केले आहे. या चलचित्राचे नाव ‘उद्याच्या भारताची आजची व्यथा’ असे देण्यात आले आहे.

फायबरचा महाल
मीरची गल्ली – शहरातील मीरची गल्ली येथील व्यापारीवर्गाच्या तरुणांच्या स्वराज्य गणेशोत्सव मित्र मंडळाने यंदा मंदीच्या सावटामुळे स्वच्छेने वर्गणी जमा करुन गणेशाच्या आरास सजावट ही फायबरच्या महालाच्या चित्रांची केली आहे. यावेळी गणेशोत्सवावर ३० टक्के मंदीचे सावट असल्याची माहिती या मंडळाचे प्रतिनिधी रुपेश ठाकरे यांनी दिली.

चलचित्राद्वारे वात्सवता
बल्लाळेश्वर मंदिर – पनवेल शहरातील बल्लाळेश्वर मंदिर येथील सन्मित्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला ५२ वर्षांची परंपरा आहे. या मंडळाच्या पन्नासहून अधिक गणेशभक्तांनी यंदा भक्तांना जागविण्यासाठी गणेशोत्सवाची लोकमान्य टिळकांनी केलेली स्थापना आणि सध्याचा नागरिक याबाबतचे सत्य उजेडात आणणारे सात मिनिटांचे चलचित्र या गणेशोत्सवात सादर होणार आहे. ज्येष्ठांसह वयोवृद्ध कार्यकर्ते एकमेकांच्या साहय़ाने या मंडळात कोणताही शक्य तेवढे नियम व रूढी, परंपरा जपून हा धार्मिक प्रबोधनकारी उपक्रम पार पाडत असल्याचे मंडळाचे प्रतिनिधी अनिल कुलकर्णी यांनी सांगितले. यंदाच्या गणेशोत्सवातून मिळणारा निधी दुष्काळग्रस्तांसाठी हे मंडळ देणार आहे.

विठ्ठलभक्तीचे चलचित्र
पायोनीयर विभाग – येथील अभिनव युवक गणेशोत्सव मंडळाच्या शंभरांहून अधिक सदस्यांनी यंदा गोरा कुंभार हे विठ्ठलाच्या भक्तीचे चलचित्र येथे गणेशभक्तांना पाहायला मिळेल, अशी माहिती या मंडळाचे प्रतिनिधी परेश बोरकर यांनी दिली. मागील २६ वर्षांपासून ही परंपरा अभिनव मंडळाने जपली आहे.

सामाजिक विषयांवर प्रबोधन
मिडलक्लास सोसायटी – पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटीमधील कांतिलाल प्रतिष्ठान मंडळाचे हे चौथे वर्ष आहे. यंदा प्रतिष्ठानाने महागणपतीसमोर अकरा दिवस तालुक्यातील नावाजलेली भजनसम्राट, तसेच सुप्रिया पाठारे, शरद पोंक्षे, गिरीश ओक, डॉ. तात्याराव लहाने, अभिनेते डी. संतोष यांचे सामाजिक विषयावर प्रबोधन पनवेलकरांना ऐकायला मिळेल.

एक गाव एक गणपती
तळोजा – परिसरातील रोहिंजण गावामध्येही पन्नास वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. गावात अवघे दोनच गणेशोत्सव साजरी करणारी मंडळे आहेत. जय दुर्गा गणेश मंडळ आणि दुर्गा माता गणेशमंडळ अशी त्यांची नावे आहेत. जय दुर्गा मंडळ मागील चार वर्षांपासून अष्टकोनी लाकडी मखरामध्ये गणेशाला सजवून त्याची आरास पूर्ण करणार आहेत. मोहो गावात एक गाव एक गणपती ही परंपरा जपली आहे. ५५ वर्षांपासून या गावातील हनुमान मंदिरामध्ये गणेशाची स्थापना केली जाते. घरोघरी गणेशोत्सव साजरा होत नसल्याने मंदिरामध्ये गावातील तरुण एकत्र जमा होऊन जागरण केले जाते. सायंकाळी महिलांचा भोवरी नाच हे येथील वैशिष्टय़ आहे. विचुंबे, छाकटा खांदा, रिटघर, उसर्ली या गावांनीही परंपरा जपली आहे. शहरातील व्यापाऱ्यांच्या स्वराज्य सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने आपला हात आखडता घेतला आहे.