सत्कारानिमित्त मिळालेल्या शाली गंगाराम गवाणकर वाटणार
अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांना विविध ठिकाणी मिळालेल्या शालींची ऊब आदिवासी आणि झोपडपट्टी व पदपथावर राहणाऱ्या गरजूंना मिळणार आहे. ठाणे येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनापूर्वी आत्तापर्यंत मिळालेल्या या सर्व शाली वाटून टाकण्याचे गवाणकर यांनी ठरविले आहे.
नाटय़ संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर गवाणकर यांचे मुंबईसह संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी सत्कार झाले. सत्कार सोहळ्याचा हा सिलसिला अद्यापही थांबलेला नाही. कालच राजापूर येथे गवाणकर यांचा सुवर्णमहोत्सवी सत्कार झाला. आत्तापर्यंत झालेल्या सत्काराच्या निमित्ताने गवाणकर यांच्याकडे पन्नासहून अधिक शाली जमा झाल्या आहेत.
आता इतक्या शालींचे करायचे काय? त्या नुसत्या ठेवून देण्यापेक्षा ज्यांना त्याची खरी आवश्यकता आहे, अशा गरजू लोकांना मला मिळालेल्या या शाली देण्याचे ठरविले असल्याचे गंगाराम गवाणकर यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी हे मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना घेऊन बालनाटय़ बसवीत आहेत.
त्याचे काही ठिकाणी प्रयोगही झाले आहेत. मतकरी यांच्या मदतीने झोपडपट्टी किंवा पदपथावर राहणाऱ्या अशा मुलांच्या कुटुंबीयांना तसेच आदिवासी भागातील लोकांना या शाली वाटणार आहे. सध्या थंडीचेही दिवस असून या दिवसात आदिवासी किंवा झोपडपट्टीतील गरजूंना त्या शालींची खरोखरच मदत होईल, ऊब मिळेल असे मला वाटते. मिळालेल्या या शाली नुसत्या पडून राहण्यापेक्षा त्याचा कोणाला उपयोग झाला तर ते जास्त चांगले, याच उद्देशाने आपण हे काम करणार असल्याचे गवाणकर म्हणाले.कोकणातील माडबन येथेही नुकताच माझा सत्कार झाला. तेव्हा सुवासिनींनी माझे औक्षण केल्यानंतर त्या प्रत्येकीला ओवाळणी म्हणून मी शाल भेट दिली.
ठाण्यातील नाटय़ संमेलन होईपर्यंत विविध ठिकाणी सत्कार होतच राहणार आहेत. या वेळी मिळालेल्या शाली आपण वाटून टाकणार असल्याचेही गवाणकर म्हणाले.
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी मांडलेल्या कल्पनेनुसार रंगभूमीवर योगदान दिलेल्या ज्येष्ठ रंगकर्मीच्या निवासस्थानी जाऊन मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. येत्या एक दोन महिन्यात ज्येष्ठ नाटय़ व्यवस्थापक मामा पेडणेकर, माझे गुरू संभाजी महाडिक, दीनानाथ लाड, काही माजी नाटय़ संमेलनाध्यक्ष यांच्या घरी मी जाणार असल्याचा पुनरुच्चारही गवाणकर यांनी ‘वृत्तान्त’कडे केला.