केंद्रीय स्वच्छता पथकाच्या पाहणीसाठी भाडय़ाने घेतलेल्या कुंडय़ा; स्वच्छता कर्मचारीही गायब

नवी मुंबई : वारंवार कचरा टाकला जातो म्हणून प्रशासनाने कचरा हटवून तेथे झाडाच्या कुंडय़ा ठेवल्या होत्या. तीन-चार दिवसांत या कुंडय़ा व स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी दिसत नाही. तसेच येथे कचराही पडलेला आहे. याबाबत माहिती घेतली असता पालिका प्रशासनाने स्वच्छता पथकाकडून पाहणी होणार असल्याने हे नाटक केले होते अशी माहिती समोर आली आहे.

स्वच्छता सर्वेक्षण पथक कोपरखैरणे भागात फिरणार असल्याच्या शक्यतेने सर्व ठिकाणी स्वच्छता करण्यात आली होती. ज्या ठिकाणी कचरा रस्त्यावर टाकला जात होता अशा ठिकाणचे रस्ते धुऊन स्वच्छ करण्यात आले होते. एका ठिकाणी वारंवार कचरा टाकला जात असल्याने तेथे दोन झाडांच्या कुंडय़ा व एक सुरक्षारक्षकही नेमण्यात आला होता. मात्र आता या कुंडय़ाही दिसेनाशा झाल्या आहेत.

या बाबत कोपरखैरणे स्वच्छता विभागातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर कचरा टाकतात अशा सुमारे तीन ठिकाणी स्वच्छता करून झाडांच्या कुंडय़ा ठेवण्यात आल्या होत्या. तेथे एका कर्मचाऱ्याने तीन-चार दिवसांनी पथक येऊन गेल्याचे कळल्याने कुंडय़ा परत देऊन टाकण्यात आल्या. या कुंडय़ा तात्पुरत्या भाडय़ाने आणण्यात आल्याचेही एका स्वच्छता कामगाराने माहिती दिली. त्यामुळे महापालिकेची स्वच्छता हा फार्स आहे का अशी शंका उपस्थित होत आहे.

कोपरखैरणेत रस्त्यावर कचरा टाकण्यात येत होता. तेथे स्वच्छता करून कुंडय़ा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्या काढण्यात आल्या असून आता त्याला पर्याय म्हणून कचरा वाहन करणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. 

– बाळासाहेब राजळे, उपायुक्त घनकचरा विभाग