महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
कामोठे शहरातील सध्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे कचरा. शहारातील लोकवस्ती वाढत गेली; परंतु कचऱ्या व्यवस्थापनाकडे पालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील राहिवासी आजही या समस्येतून मुक्त झालेले नाहीत. प्रभाग १२ मध्ये ही समस्या अधिकच गंभीर आहे.
प्रत्येक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. त्या दिवसभरात तुडुंब भरून वाहू लागतात. कामोठे शहर वसविण्यात आले, तेव्हा जेवढे सफाई कामगार होते, तेवढेच आजही आहेत.
लोकवस्ती मात्र कित्येक पटींनी वाढली आहे. परिणामी या प्रभागातील कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही. त्यामुळे शहराचा उकिरडा झाला आहे. पावलोपावली कचऱ्याचे ढिग साचलेले असतात. अस्वच्छतेमुळे
येथील रहिवाशांना दरुगधी, साथीचे आजार अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
कामोठे गावात मोकळ्या भूखंडाची कचराभूमीच झाली आहे. महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने पहावे अशी अपेक्षा रहिवासी व्यक्त करत आहेत.
महापालिकेत समाविष्ट होऊनही या परिसरातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू सहजपणे मिळत नाहीत. इथे दुधाच्या पिशवीवर लिटर मागे २ ते ३ रुपये अधिक घेऊन ग्राहकांना लुटले जाते.
सिडकोने अन्याय केल्याची भावना येथील मतदारांमध्ये आहे. या भागात लहान मुलांसाठी उद्याने नाहीत, पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कळंबोली, खारघर, कामोठे या शहरांच्या सुशोभीकरणाच्या नावावर सिडकोने आणि ठेकेदारांना मलिदा लाटण्याशिवाय काहीही केलेले नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

रुग्णालय सुरू करण्याची मागणी
या प्रभागात शासकीय रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र शासन व सिडकोने याकडे दुर्लक्ष केले आहे. याचाच गैरफायदा येथील खासगी रुग्णालये घेत आहेत. कामोठय़ात पावलोपावली खासगी रुग्णालये आहेत. तिथे अवाच्यासवा फी उकळली जाते. त्यामुळे महापालिकेचे किंवा सरकारी रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.
प्रभाग क्षेत्र
- सेक्टर १०, १४, १५, १६, १८, १९, २१, कामोठे गाव
