नवी मुंबई :  ऐरोलीतील दिवा नाका येथे रस्ता ओलांडण्यासाठी होत असलेली अडचण पाहता मोठा स्कायवॉक बांधला आहे. मात्र याचा वापर पादचाऱ्यांकडून कमी होत असून त्यावर भिकारी, गर्दुल्ले राहत आहेत. स्कायवॉकवर त्यांची कपडे व साहित्य पडलेले दिसत आहे. ऐरोली विभाग कार्यालयाकडे याबाबत तक्रारी दिल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ऐरोलीतील दिवा नाका परिसर म्हणजे नवी मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा चौक. येथून मुंबई, ठाणे, मुलुंड, अंधेरी एमआयडीसी ते व्हाया नवी मुंबई, ठाणे-बेलापूर एमआयडीसी, डोंबिवली-कल्याण- बदलापूर मार्गावरील हजारो वाहनांची ये-जा असते. यात अवजड वाहनांची संख्याही अधिक असते. त्यामुळे येथून रस्ता ओलांडणे एक दिव्य होते. दर काही दिवसांनी येथे पादचारी व वाहने यांचे अपघातही होत होते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी तीन ठिकाणी जाता येईल असा भव्य स्कायवॉक नवी मुंबई महापालिकेने बांधला आहे. मात्र त्याचा ताबा कायम भिकारी व गर्दुल्ले यांच्याकडेच असतो.  त्यामुळे एकटय़ा महिलांना येथून पायी जाणे धोक्याचे ठरत आहे. हे लोक महिलांकडे पाहूण अश्लील वर्तन करीत असल्याचे येथील सुशील जाधव यांनी सांगितले.

याविषयी विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ  शकला नाही. आम्ही अनेकदा पोलिसांची मदत घेऊन भिकारी व गर्दुल्ल्यांना हाकलून देतो. मात्र ते पुन:पुन्हा येतात असे एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.