नवी मुंबई : वाशी एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीपासून नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. बाजारात आता पूर्णपणे नवीन लसूण दाखल होत आहे. नवीन लसणाची आवक वाढली असल्याने लसणाचे दर उतरले आहेत. घाऊक बाजारात दर ८० ते ११० रुपयांवरून आता ५० ते ८५ रुपयांवर आले आहेत.
हेही वाचा – नवी मुंबई : एल अॅण्ड टी कंपनीचे सीवूड्स येथील पदपथाचे काम पुन्हा सुरू
हेही वाचा – शीव-पनवेल मार्गावर मार्गिका पट्टे नसल्याने छोट्या अपघातात वाढ
एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक जादा आहे. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येत असतात. चार वर्षांपूर्वी लसणाचे दर गगनाला भिडले होते. प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांची मजल मारली होती. एपीएमसीत मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची आवक होते. सध्या मध्यप्रदेश येथील १४ गाड्या लसूण दाखल होत आहे. यामध्ये दोन प्रकारच्या लसणाचा समावेश आहे. एक देशी लसूण आणि दुसरा उटी लसूण. यामध्ये उटी अधिक दराने विक्री होत असून प्रतिकिलो ४०-८५, तर देशी लसूण ३०-५० रुपयांनी विक्री होत आहे. नवीन लसूण दाखल होत असून आवक चांगली होत असल्याने दरात घसरण झाल्याचे मत घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.