नवी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी आजच्या पिढीला माहिती होण्यासाठी नवी मुंबईत गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा आणि शिवसेनेने आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच त्यांची खासदारकी रद्द केली गेली. नंतर त्यांनी 'मी माफी मागणार नाही, मी गांधी आहे, सावरकर नाही', असे वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यात पुन्हा सावरकर यांच्यावरून शाब्दिक चकमक घडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात 'स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर गौरव यात्रेची' घोषणा केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे नवी मुंबईत ही गौरव यात्रा निघणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत नवी मुंबई भाजपा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली. हेही वाचा - पनवेलमध्ये बांधकाम व्यावसायिक महिलेवर गोळीबार शिवसेना प्रसिद्धी प्रमुख किशोर पाटकर यांनी माहिती देताना सांगितले की, या गौरव यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील विविध पैलूंसह माहिती प्रदर्शनी दाखविली जाणार आहे. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे अभूतपूर्व योगदान समाजातील सर्व घटकांतील वर्गापर्यंत पोहोचविण्याचे कार्य यानिमित्ताने होणार आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विषयी केलेले वक्तव्य हे पोरकटपणाचे आहे. त्यांच्या घटक पक्षातही एकमत नाही. स्वतः शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागत आहे. सावरकर यांच्या विषयी केलेले वक्तव्य अत्यंत दूषित असून तसेच आजच्या पिढीला सत्य परिस्थिती सांगण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली. हेही वाचा - नवी मुंबई : गांजा विकणाऱ्यावर कारवाई; ३ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त यात्रा मार्ग : बेलापूर विधानसभा क्षेत्रात निघणारी गौरव यात्रा ही महानगरपालिकेसमोरील गोवर्धिनी माता मंदिरपासून निघणार असून, ती पाम मार्गे छ. शिवाजी महाराज चौकपर्यंत येणार आहे. छ. शिवाजी महाराज चौकात सावरकर यांच्या विषयी समग्र माहिती देण्यात आल्यावर यात्रा विसर्जित होणार आहे.