नवी मुंबई : घणसोली ते ऐरोली या नवीन मार्गाचे काम प्रगतीपथावर असून २०२७ पर्यंत हा मार्ग पूर्ण होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई महानगर पालिका आणि सिडको यांच्या समसमान भागीदारीतून सुमारे ५५० कोटींचा हा रस्ता बनत आहे. यामुळे ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली महापे ते ठाणे , घणसोली महापे ते मुलुंड या मार्गावरील वाहतूक कोंडी पासून सुटका होणार आहे.
नवी मुंबईतून ठाणे बेलापूर आणि शीव पनवेल तसेच बेलापूर जेएनपीटी हे सर्वाधिक व्यग्र मार्ग आहेत. त्यात नाशिक, मुंबई, मीरा भाईंदर, गुजरात मार्गावर रोजच्या रोज वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दिवसा हलकी वाहने तर रात्री जड अवजड वाहनांच्या मुळे या मार्गावर रात्रदिवस प्रचंड वाहतूक असते. त्यात आता आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची कामे वेगात होत असून यात कार्गो सेवा सुरू झाल्यास येत्या काळात हा मार्ग तोकडा पडणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता घणसोली पाम बीच ते ऐरोली हा नवीन मार्ग सुरू करण्यात आला असून संथ गतीने सुरू असलेल्या कामाने आता वेग घेतला आहे. घणसोली ते ऐरोली दरम्यान उभारण्यात येत असलेल्या पाम बीच रोड विस्तार व पुल प्रकल्पाच्या कामाला सध्या गती मिळाली आहे. प्रकल्प सध्या फाउंडेशन आणि बोर पाइलिंगच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून अनेक ठिकाणी प्रत्यक्ष बांधकाम कार्य सुरू आहे.
वैशिष्ट्ये –
हा मार्ग साडे तीन किलोमीटर आणि सहा मार्गिकेचा असणार आहे. यासाठी अंदाजित निधी ५५० कोटी अपेक्षित आहे. सिडको आणि नवी मुंबई महानगर पालिका दोन्ही मिळून याचा खर्च उचलणार असून काम नवी मुंबई महानगर पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या देखरेखी खाली असणार आहे. हा पूल नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील चौथा खाडीपूल ठरणार आहे.

