नवी मुंबई : शहरातील नालेसफाईची कामे, विविध नागरी सुविधा तसेच घणसोली-ऐरोली खाडीवरील पामबीच मार्ग विस्तार प्रकल्पाचा बुधवारी प्रत्यक्ष पाहणी दौरा करत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान रखडलेल्या पामबीच पुलाच्या कामाला गती देण्यासह नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले.
घणसोली-ऐरोली खाडीवरील पामबीच मार्ग विस्तार प्रकल्प हा नवी मुंबईतील दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला प्रकल्प मानला जातो. मूळ पामबीच रस्त्याचे नियोजन २००४ मध्ये करण्यात आले होते. बेलापूर ते घणसोली हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित भाग कांदळवन क्षेत्र आणि पर्यावरणीय परवानग्यांतील अडचणींमुळे अनेक वर्षे रखडला होता. त्यानंतर आराखड्यात बदल करून उन्नत पुलाचा पर्याय स्वीकारण्यात आला आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर फेब्रुवारी २०२५ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
सुमारे ३.४७ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामध्ये सुमारे १.९ किलोमीटर उन्नत पूल कांदळवन क्षेत्रावर उभारला जात आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे ५४० कोटी रुपये असून तो महापालिका आणि सिडको यांच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येत आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर घणसोली-ऐरोली दरम्यान थेट दळणवळण निर्माण होऊन ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन नवी मुंबई, ठाणे तसेच मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक जलद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या पुलाच्या पिअर्स (पुलाला आधार देणारे खांब) उभारण्याचे काम सुरू असून ८९ पैकी ४४ पिअर्स पूर्ण झाले आहेत. उर्वरित पिअर्सचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पावसाळ्यातही स्पाईन, विंग व गर्डर कास्टिंगची कामे सुरू ठेवावीत, तसेच गर्डर लाँचिंग सुरू झाल्यानंतर कामात खंड पडू नये, यासाठी दिनांकनिहाय नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे.
नालेसफाईबाबत आयुक्तांचे निर्देश
- नालेसफाईच्या कामांना गती देत गाळ काढण्यावर विशेष भर.
- गाळ सखोल काढून तो सुकताच त्वरित उचलणे बंधनकारक.
- नाल्यांमध्ये दूषित पाणी मिसळू नये यासाठी एमआयडीसी, एमपीसीबी व महापालिका यांच्या संयुक्त पाहणीची व्यवस्था करण्याचे निर्देश.
- पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे.
