नवी मुंबई : भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी रविवारीही रेड अलर्ट जारी करून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असतानाच घणसोलीतील मेघ मल्हार सोसायटीलगत सुरू असलेल्या बांधकाम साइटवरील लोखंडी पत्रे अचानक कोसळून रस्त्यालगत उभ्या असलेल्या सुमारे आठ ते दहा चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घटना घडली त्यावेळी वाहनांमध्ये किंवा परिसरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

रविवारी सकाळपासून नवी मुंबईत पावसासह जोरदार वारे वाहत होते. या वाऱ्यामुळे बांधकाम प्रकल्पाभोवती उभारण्यात आलेली लोखंडी पत्रे अचानक कोसळले. हे पत्रे थेट रस्त्यालगत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर पडल्याने अनेक वाहनांचे छप्पर, काचा, बोनेट आणि इतर भागांचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटना घडली त्यावेळी वाहनांमध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता गंभीर अपघात घडू शकला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. नुकसानग्रस्त वाहनधारकांनी बांधकामस्थळी सुरक्षेचे निकष पाळले गेले का, असा प्रश्न उपस्थित करत संबंधितांवर संताप व्यक्त केला.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने रविवारीही मुंबई आणि एमएमआरसाठी रेड अलर्ट कायम ठेवत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी २१०.७६ मिमी पावसाची नोंद झाली होती. रविवारी सकाळी ८.३० ते ११.३० या तीन तासांत सरासरी २० मिमी पावसाची नोंद झाली असून या कालावधीत शहरात ११ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

रेड अलर्टमुळे महापालिकेचे नागरिकांना आवाहन

मुंबई आणि एमएमआरमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी महापालिकेची सर्व क्षेत्रीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून मदतीसाठी टोल-फ्री हेल्पलाईन १८००२२२३०९ आणि १८००२२२३१० कार्यरत आहेत.