नवी मुंबई : घणसोली गावातील इंद्रावती रुग्णालयाशेजारी असलेल्या दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. बुधवारी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास दुकानांमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्याने स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करून लगतची दुकानेही कवेत घेतली. या आगीत चार दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून, दुकानांतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घणसोली गावातील इंद्रावती रुग्णालयालगत दुकानांची रांग आहे. मध्यरात्रीच्या वेळी बहुतांश दुकाने बंद असताना एका दुकानातून आग भडकली. सुरुवातीला दुकानातून धूर येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. मात्र, आग वेगाने पसरत गेल्याने काही वेळातच शेजारील दुकानांनाही त्याची झळ बसली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाशी अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रोहन कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच कोपरखैरणे विभागाच्या दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम सुरू केले. आग आणखी पसरू नये यासाठी परिसराला सुरक्षित करत पाण्याचा मारा करण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

मात्र, आग आटोक्यात येईपर्यंत चार दुकाने पूर्णपणे जळाली होती. दुकानांमधील साहित्य, फर्निचर तसेच अन्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची तीव्रता आणि दुकानांमध्ये असलेल्या साहित्यामुळे नुकसान वाढल्याची शक्यता आहे. या नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. संबंधित दुकानदारांकडून नुकसानीचा तपशील घेतल्यानंतर त्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक स्तरावर विद्युत बिघाड किंवा शॉर्टसर्किटची शक्यता तपासली जात आहे. मात्र, त्याबाबत अग्निशमन दलाकडून अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. घटनास्थळाची पाहणी तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आगीचा उगम आणि कारण शोधण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडूनही या घटनेची माहिती घेण्यात येत आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मध्यरात्री दुकानांना लागलेल्या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुकानांची रचना, विद्युत जोडण्या आणि आगीच्या संभाव्य कारणांची तपासणी झाल्यानंतर या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.